विजयी उमेदवारांची सरपंचपदासाठी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:41+5:302021-02-05T09:22:41+5:30
मालेगाव तालुक्यातील काही गावात अपक्ष उमेदवार निवडून आले असून, या उमेदवांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे . आपल्याकडे एकहाती ...

विजयी उमेदवारांची सरपंचपदासाठी कसरत
मालेगाव तालुक्यातील काही गावात अपक्ष उमेदवार निवडून आले असून, या उमेदवांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे . आपल्याकडे एकहाती सत्ता राहावी, यासाठी गावपुढारी या अपक्ष उमेदवारांचे मतपरिवर्तन करण्याच्या तयारीत आहेत . सरपंचपदासाठी सट्टाबाजार होत असल्याने आणि बोगस आदिवासींचे दाखले जोडल्या जात असल्याने शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेतला.
निवडणुकीपूर्वी आरक्षण काढल्याने सरपंचपदाच्या आरक्षित जागेवर जोर लावून गावागावात संघर्ष होत होता. यावेळेस आरक्षण नसल्याने सर्वच जागा खेळीमेळीच्या वातावरणात लढल्या गेल्या. आता संख्याबळ स्पष्ट झाल्याने सरपंचपदासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी गाव पॅनलने बहुमत मिळविले असले तरी सरपंचपदासाठी आरक्षणातील उमेदवार नसल्यास बहुमत असूनही सरपंचपद विरोधकांकडे जाण्याची भीती सर्वांना आहे. आरक्षण सोडतीनंतर हालचाली गतिमान होणार आहेत. सरपंच कोणाचा, हे आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार असले तरी मालेगाव तालुक्यात फोडाफोडीचे राजकारण आतापासूनच जोर धरू लागले आहे.
--------
अपक्षांच्या ओढाओढीचा खेळ
अपक्षांच्या ओढाओढीचा खेळ
पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत पैसा वापरला जात नव्हता, परंतु वित्त आयोगानुसार विकासकामाचा सरळ पैसा ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने आणि हा निधी मोठा असल्याने सरपंच बनण्यासाठी पैसे देऊन सदस्य खरेदीचा व्यवहार होणार आहे. आता पॅनलकडून निवडून आलेले सदस्य आर्थिक लाभापोटी आणि पद मिळविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे अपक्षांच्या ओढाओढीचा खेळ गावोगावी रंगणार आहे.
---------------
सरपंचासाठी फोडाफोडीचे राजकारण
ग्रामपंचायतीचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतरही सर्वच पक्षांकडून सर्वांत जास्त आमची सत्ता आल्याचे दावे केल्या जात आहे. अनेक तालुका पुढाऱ्यांना गावात दारुण पराभवाचा सामना करावा लागला, तरी तुम्ही सरपंचपद निवडीच्या वेळेस बघा, सरपंच आमचाच होणार असल्याचा दावा केला जात आहे. यावरून सरपंचपदाचे आरक्षण निघाल्यानंतर सर्व ग्रामपंचायतींत मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण होणार आहे.