पोटनिवडणुकीत सर्वांनाच रस; जिल्हाध्यक्षांचा लागणार कस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST2021-09-23T04:47:59+5:302021-09-23T04:47:59+5:30

संतोष वानखडे वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. ...

Everyone interested in the by-election; District President will have to work hard! | पोटनिवडणुकीत सर्वांनाच रस; जिल्हाध्यक्षांचा लागणार कस!

पोटनिवडणुकीत सर्वांनाच रस; जिल्हाध्यक्षांचा लागणार कस!

संतोष वानखडे

वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रमुख पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषदेत पक्षाला नंबर वन बनविण्यासाठी जिल्हाध्यक्षांचा चांगलाच कस लागणार आहे.

वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करून पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. गतवेळी जिल्हा परिषदेत राकाॅ हा ‘नंबर वन’चा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर काॅंग्रेस आणि तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडी होती. पोटनिवडणुकीत कुणाला किती जागा मिळतील यावर जिल्हा परिषदेत नंबर वन कोण ठरणार आणि पर्यायाने अध्यक्षपद कुणाकडे येणार हे अवलंबून राहणार आहे. स्वपक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष कामाला लागले असून, गतवेळचे संख्याबळ कायम ठेवण्याबरोबरच संख्याबळ वाढविण्यात जिल्हाध्यक्षांचा चांगलाच कस लागणार आहे. यात कुणाला यश येणार, कुणाचे नेतृत्व गुण कमी पडणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

................

काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पहिल्यांदाच जाणार निवडणुकीला सामोरे

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीला काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार झनक पहिल्यांदाच सामोरे जात आहेत. ओबीसी आरक्षणामुळे काॅंग्रेसची दाभा गटाची जागा कमी झाली आहे. दाभा गटाबरोबरच अन्य काही गटातही काॅंग्रेस उमेदवार निवडून आणण्यात झनक यांचे राजकीय कसब दिसून येणार आहेत. दुसरीकडे अमित झनक यांचे ‘होम ग्राऊंड’ असलेल्या गोभणी गटात गतवेळी जनविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला होता. आता गोभणी गटातही पोटनिवडणूक होत असल्याने गतवेळच्या पराभवाचा वचपा काढला जातो की महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला सोडली जाते? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

.....................

‘नंबर वन’ कायम ठेवण्यासाठी राकाॅंची धडपड!

गतवेळी जिल्हाध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात राकाॅंने सर्वाधिक १२ जागा जिंकून जिल्हा परिषदेत ‘नंबर वन’चा मान मिळविला होता. ओबीसी आरक्षणामुळे राकाॅंच्या तीन जागा रिक्त झाल्या असून, या तीन जागा जिंकण्याबरोबरच आणखी काही जागा निवडून कशा आणता येतील, याचे नियोजन राकाॅंने केल्याचे दिसून येते. यात कितपत यश येते? हे निकालानंतरच दिसून येईल.

Web Title: Everyone interested in the by-election; District President will have to work hard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.