अखेर आरोग्य कर्मचा-यांना मिळाले वेतन
By Admin | Updated: June 11, 2016 02:59 IST2016-06-11T02:59:56+5:302016-06-11T02:59:56+5:30
प्रशासनाची दखल: नियमित वेतन करण्याची मागणी

अखेर आरोग्य कर्मचा-यांना मिळाले वेतन
मंगरुळपीर (जि. वाशिम): येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांना मागील दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात लोकमतमध्ये ५ जून रोजी ह्यआरोग्य कर्मचार्यांचे वेतन दोन महिन्यांपासून थकीतह्ण या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित होताच या कर्मचार्यांना ६ जून रोजी एका महिन्याचे वेतन अदा करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या अडचणी थोड्याफार कमी झाल्या आहेत. मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार, लिपिक, तसेच इतर कर्मचारी मिळून जवळपास ८0 पेक्षा अधिक अधिकारी कार्यरत आहेत. यापैकी २८ कर्मचारी हे कायम असून, ४५ कर्मचारी कंत्राटी आहेत. कायम कर्मचार्यांमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकार्यांसह अधिपरिचारिका आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. या सर्व कर्मचार्यांना मार्च २0१६ नंतर वेतन मिळालेले नाही. मागील काही महिन्यांपासून कर्मचार्यांचे वेतन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. कार्यालय अधीक्षक सर्व कर्मचार्यांच्या वेतनाची बिले ऑॅनलाइन पद्धतीने कोषागार कार्यालयाकडे सादर करीत असतात. बिले सादर केल्यानंतर कर्मचार्यांना साधारण आठवडाभराच्या आतच वेतन मिळते; परंतु मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांचे वेतन दोन महिन्यांपासून थकीत असल्याने अधिकारी व कर्मचार्यांना विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ आली होती. वेतन थकल्यामुळे घर बांधणीसाठी घेतलेल्या गृहकर्जापोटी बँकांकडून हप्ते भरण्यासाठी वारंवार तगादा सुरू झाला होता, तसेच वीज बिलाची रक्कम भरण्यासाठीही त्यांना आग्रह करण्यात येत होता.