शिकाऊ उमेदवार वाढीव विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत !
By Admin | Updated: July 25, 2015 01:41 IST2015-07-25T01:41:36+5:302015-07-25T01:41:36+5:30
महावितरणच्या अकोला परिमंडळातील स्थिती.

शिकाऊ उमेदवार वाढीव विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत !
संतोष वानखडे / वाशिम : महावितरण कंपनीमध्ये सेवा देणार्या शिकाऊ उमेदवारांच्या विद्यावेतनात ७0 ते ८0 टक्के वाढ करण्याचे आदेश मे महिन्यातच निघाले आहेत. मात्र, दोन महिन्याचा कालावधी लोटूनही शिकाऊ उमेदवारांना जुन्याच पद्धतीने २७00 रुपये विद्यावेतन दिले जात आहे. महावितरण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवार विविध प्रकारची सेवा बजावतात. या उमेदवारांना २७00 रुपये विद्यावेतन दिले जाते. महागाईच्या काळात २७00 रुपये विद्यावेतन अत्यल्प असल्याच्या पृष्ठभूमीवर तांत्रिक अँप्रेंटिस असोसिएशनने विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी लावून धरली होती. या पृष्ठभूमीवर ५ मे २0१५ रोजी विद्यावेतनात पहिल्या वर्षी ७0 टक्के आणि दुसर्या टप्प्यात ८0 टक्के वाढ करण्याचे आदेश शासनाने काढले. यानुसार अकोला परिमंडळातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यातील जवळपास ८२५ शिकाऊ उमेदवारांना सुधारित विद्यावेतन मिळणे अपेक्षीत आहे. मात्र, दोन महिन्याचा कालावधी लोटुनही सुधारित विद्यावेतन मिळाले नसल्याने शिकाऊ उमेदवारांना २७00 रुपयातच महिना काढावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यात १0५ च्या आसपास शिकाऊ उमेदवार आहेत. २७00 रुपयात पहिल्यात वर्षी ७0 टक्के वाढ झाली तर शिकाऊ उमेदवारांना ४५00 च्या आसपास विद्यावेतन मिळणार आहे. अत्यल्प विद्यावेतन असल्याने शिकाऊ उमेदवारांसमोर आर्थिक पेच निर्माण होत आहे.