सोयाबीन अनुदानाची प्रतिक्षा संपेना 

By Admin | Updated: May 13, 2017 18:36 IST2017-05-13T18:36:57+5:302017-05-13T18:36:57+5:30

जिल्ह्यातील वास्तव: तीन महिन्यांपासून प्रस्तावाची पडताळणी प्रलंबितच 

End of soybean donation waiting | सोयाबीन अनुदानाची प्रतिक्षा संपेना 

सोयाबीन अनुदानाची प्रतिक्षा संपेना 

जिल्ह्यातील वास्तव: तीन महिन्यांपासून प्रस्तावाची पडताळणी प्रलंबितच 
वाशिम: शासनाने मागील वर्षीच्या खरीप हंगामात बाजार समितीत १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये आणि कमाल २५ क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भातील प्रस्ताव ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांकडून मागवून जिल्हा उपनिबंधकांमार्फत पणन संचालकांकडे २८ फे ब्रुवारी पर्यंत पाठविणे आवश्यक असताना तीन महिने उलटले तरी, प्रस्ताव पणन संचालकांकडे पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या अनुदानासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागेल. 
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी सोयाबीन विक्रीपट्टीसह आपला सात-बारा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांकासह सोयाबीन विक्री केलेल्या संबंधित बाजार समितीकडे अर्ज सादर केले आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार केल्यानंतर तालुका सहायक निबंधकांनी प्रस्ताव तपासून जिल्हा उपनिबंधकांना द्यावयाचे आहेत. त्यानुसार बाजार समित्यांनी मागील महिन्यात त्यांच्याकडे आलेल्या प्रस्तावांची तपासणी करून ते अर्ज तालुका निबंधकांकडे सादर केले आहेत; परंतु अद्याप हे प्रस्ताव जिल्हास्तरावर पोहोचले नाहीत.  वाशिम जिल्ह्यातून ५३९६१ शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज सादर केले आहेत. तालुका सहायक निबंधकांकडे या अर्जांची पडताळणी सुरू आहे. तीन महिने उलटत आले तरी तालुका सहनिबंधकांकडून अर्जांची पडताळणी पूर्ण करून ते जिल्हास्तरावर सादर करण्यात आले नसल्याची माहिती वाशिमच्या जिल्हा उपनिबंधकांकडून प्राप्त झाली आहे.  

शेतकऱ्यांच्या सोयाबीन अनुदानाच्या प्रस्तावाची तालुकास्तरावरील पडताळणी उरकली असून, येत्या आठवडाभरात सर्व प्रस्ताव पणन संचालकांकडे सादर करण्यात येतील.-ज्ञानेश्वर खाडे,जिल्हा उपनिबंधक, वाशिम.

Web Title: End of soybean donation waiting