नदीकाठावरील अतिक्रमणे अद्यापही कायमच
By Admin | Updated: June 30, 2014 02:08 IST2014-06-30T01:45:43+5:302014-06-30T02:08:57+5:30
पूरप्रवण भागातील अतिक्रमणे काढण्याचे वाशिम जिल्हाधिकार्याचे आदेश धाब्यावर.

नदीकाठावरील अतिक्रमणे अद्यापही कायमच
वाशिम : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील नद्या,ओढयांच्या काठावरील गावांमधील व शहरांतील भागांमधील पूरप्रवण क्षेत्रात अतिक्रमण करुन बांधलेल्या झोपड्यांची व अन्य अतिक्रमणे काढण्याचे आदेश मे महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील संबंधित अधिकार्यांना दिले होते.तथापि,अद्यापपर्यत कुठेही अशी अतिक्रमणे हटविण्यात आली नाहीत.त्यामुळे आता पावसाळ्यात अतवृष्टीमुळे नद्या,ओढय़ांना पूर आल्यास नद्याकाठच्या घरांमधील नागरिकांची जिवित व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असलेतरी अद्यापपर्यत चांगला पाऊस पडण्यास प्रारंभ झालेला नाही.परंतु, आता लवकरच नियमित पावसाला प्रारंभ होण्याचे संकेत आहेत.जिल्ह्यात ओढे,कालवा , नदी किंवा अतवृष्टीमुळे धोका पोहोचू शकणारी १५२ गावे आहेत.वाशिम तालुक्यातील उकळीपेन ,रिसोड तालुक्यातील बाळखेड,पेनबोरी व चिंचाबापेन या गावांना पैनगंगा अतवृष्टीमुळे येणार्या पुराच्या पाण्याचा तर मंगरूळपीर तालुक्यातील बोरव्हा खुर्द या गावाला गावाजवळून वाहणार्या नाल्याला अतवृष्टीमुळे येणार्या पुराच्या पाण्याचा वेढा पडत असतो.त्यामुळे या गावांना अधिक धोका संभवतो.कारंजा तालुक्यातील शेमलाई, अंबोडा, लाडेगाव, पिंपळगाव(खुर्द) ,सिरसोली, राहटी, हिंगणवाडी, रामटेक ,कामठा व बेलखेड या गावांनाही अतवृष्टीमुळे येणार्या पुराच्या पाण्याने नुकसान होण्याची बव्हंशी शक्यता असते. यामुळेच जिल्हाधिकार्यांनी पूरप्रवण भागातील अतिक्रमणे काढण्याबाबत सर्व तहसीलदारांसह संबंधित अधिकार्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत झालेल्या सभेत आदेश दिले होते.परंतु, अद्यापपर्यंत कोणत्याची गावात अतिक्रमणे हटविण्यात आली नाहीत.जून महिन्यात पाऊस झालाच नाही.परंतु, आता जुलै महिन्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता हवामानखात्याने व्यक्त केली आहे.त्यामुळे अतवृष्टी झाल्यास नद्या, नाल्यांच्या काठी व धरणांच्या खालच्या भागात राहणार्या लोकांवर जिवित व वित्तहानीचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.