स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:31+5:302021-02-05T09:28:31+5:30

वाशिम : जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येसारखे प्रकार होऊ नये, यासाठी जनजागृतीवर भर देणे आवश्यक असून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रत्येक ...

Emphasize public awareness to prevent female feticide | स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

वाशिम : जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येसारखे प्रकार होऊ नये, यासाठी जनजागृतीवर भर देणे आवश्यक असून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याला मुलींच्या जन्मदराबाबत आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केल्या. नियोजन भवन येथे २ फेब्रुवारी रोजी झालेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान जिल्हास्तरीय कृती समितीच्या आढावा सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तेरकर, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, स्काऊटचे जिल्हा संघटक राजेश गावंडे, फार्मसिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील, अशासकीय सदस्य डॉ. अलका मकासरे, सोनाली ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, ज्या गावामध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, अशा गावांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती करावी. जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्यासारखे प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. तसेच असे प्रकार घडत असल्यास त्याची माहिती गोपनीय स्वरुपात प्रशासनला सादर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. नागरिक, स्वयंसेवी संस्थांना स्त्रीभ्रूण हत्या विषयी काही माहिती असल्यास त्यांनी प्रशासनाला कळवावे. त्यांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल. ज्या गावांमध्ये मुलींचा जन्मदर गेल्या काही वर्षात १ हजारपेक्षा अधिक आहे, अशा गावांचा सन्मान करण्यात येईल. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि आरोग्य विभागाने प्रत्येक महिन्याला अशा गावांची माहिती संकलित करावी. गावपातळीवर ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी जनजागृतीकरिता विविध उपक्रम राबवावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते म्हणाले, तालुका अथवा गाव पातळीवर ज्या स्वयंसेवी संस्था, समाजसेवक स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानासाठी स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत, अशा लोकांना प्रोत्साहन द्यावे. बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने सभा घेऊन त्यांना काही अडचणी येत असल्यास त्याची सोडवणूक करावी, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Emphasize public awareness to prevent female feticide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.