कोरोनातून बरे झाल्यानंतर व्यायाम व पोषणावर द्या भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:37 IST2021-04-05T04:37:08+5:302021-04-05T04:37:08+5:30
कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासह सुरक्षात्मक खबरदारी घेणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच कोरोनावर मात केल्यानंतरही ...

कोरोनातून बरे झाल्यानंतर व्यायाम व पोषणावर द्या भर
कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासह सुरक्षात्मक खबरदारी घेणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच कोरोनावर मात केल्यानंतरही शारीरिक पोषण गरजेचे आहे, असे डाॅक्टर सांगतात. व्यायाम, आहार, सुरक्षेबाबत मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जातात. कोरोनाबाधित रुग्णाचे वय, प्रतिकारशक्ती आणि इतर दुर्धर आजार या बाबींचा विचार करूनच आहार, व्यायाम आणि औषधांचे नियोजन महत्त्वाचे ठरते. कोरोनातून बरे झाल्यानंतर श्वसनसंस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी योगासने, प्राणायाम, चालण्याचा व्यायाम करण्याच्या सूचना रुग्णांना दिल्या जातात. कोविड वाॅर्डात उपचार घेतल्यानंतर दिनचर्येत बदल होतो. अनेकांचे झोपेचे वेळापत्रक बदलते. नैराश्य, निद्रानाश, भूक न लागणे असे प्रकार घडू शकतात; मात्र कोविडमुक्तीनंतर पुरेशी झोप घ्यावी. पौष्टिक आहार घ्यावा व तणावमुक्त राहावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
--
यामुळे व्यायाम महत्त्वाचा
व्यायामामुळे श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो. स्नायू मजबूत होण्यास मदत होते आणि मानसिक ताणही कमी होतो. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यावरही नियमित व्यायाम करावा; मात्र शरीराला अनावश्यक ताण पोहोचविणारे व्यायाम टाळावे. इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांनी प्रकृतीनुसार व्यायामाबाबत डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
--
हेही महत्त्वाचे
- सकाळी दात घासल्यानंतर गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा.
- शरीराची झीज भरून काढण्यासाठी पौष्टिक आहारच घ्यावा.
- इतर दुर्धर आजारग्रस्तांनी वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार सुरू ठेवावा.
- शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित तपासावी.
- कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
--
...तर पुन्हा होऊ शकते लागण
कोरोनातून बरे होऊन तीन महिन्यानंतर एखाद्याच्या शरीरातील ॲन्टिबाॅडीज नाहीशा होऊ शकतात. असा व्यक्ती बाधिताच्या संपर्कात आल्यास त्याला पुन्हा लागण होऊ शकते. अद्याप तसे उदाहरण आपल्याकडे दिसले नाही; मात्र कोरोनावर मात केल्यानंतर व्यायाम आणि शरीराच्या पोषणासह सुरक्षात्मक खबरदारी महत्त्वाची ठरते.
- डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम