वाशिम : कोरोनाच्या संकटकाळात एकही सुटी न घेता निरंतर रुग्णसेवा केली. मात्र, गरज संपताच आरोग्य विभागाने करार संपुष्टात आणून घरचा रस्ता दाखविला. यामुळे पुन्हा बेरोजगारीचे जिणे नशिबात आले. हा अन्याय दूर करून अनुभवाच्या जोरावर आम्हाला पुन्हा सेवेत घ्या या मागणीसाठी आता काही दिवसांपूर्वी पायउतार झालेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘एल्गार’ पुकारला आहे. त्यानुषंगाने येत्या मंगळवारी, २८ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उगारण्यात आले आहे.
यासंदर्भात कोरोनाकाळात आरोग्य खात्यात नियुक्ती मिळालेले; पण सध्या सेवा समाप्तीमुळे बेरोजगार झालेल्या ५८ संगणक परिचालकांनी (डाटा एन्ट्री ऑपरेटर) जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. त्यात नमूद करण्यात आले आहे की, कोविड काळात रुग्ण सेवा करीत असताना आमच्यापैकीच पाचजणांना जनता, प्रशासन व सरकारने कोरोना योद्धे, देवदूत, देवमाणसाचा दर्जा बहाल केला. आता मात्र त्याच लोकांसोबत दुजाभाव केला जात आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’ची ही भूमिका संतापदायक असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.
कार्यकाळ समाप्त करून अनुभवी लोकांचा रोजगार हिरावण्यात आला. यासंदर्भात सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर कोविड योद्धयांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; मात्र त्याची कुठलीच दखल घेण्यात आली नाही. याउलट बाह्ययंत्रणेमार्फत डाटा एन्ट्री ऑपरेटर ही शिकाऊ पदे भरण्यात आली. हा मोठा अन्याय असून त्याविरोधात २८ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा संबंधितांनी दिला आहे.
.....................
काय आहेत मागण्या...
बाह्ययंत्रणेद्वारे इतरांऐवजी आम्हाला परत कामावर रुजू करून घ्यावे
तीन महिन्यांऐवजी ११ महिन्यांची ऑर्डर देण्यात यावी
नोकरभरतीत आरक्षण देऊन कोरोना योद्धयांसाठी जागा आरक्षित कराव्यात
कंत्राटी तत्त्वावर जागा निघत असल्यास कोरोना योद्धयांना पहिली पसंती देऊन विनामुलाखत रुजू करून घ्यावे
...............
कोट :
कोरोनाकाळात आरोग्य विभागाने देवदूताची उपमा दिली. पुष्प उधळून आमच्या कार्याचा गौरव झाला. अशात १८ ऑगस्ट २०२१ ला कार्यमुक्त करण्यात आले. युवकांना रोजगार पुरविणे हे शासनाचे कर्तव्य आहे, मग आम्हाला बेरोजगार का केले? आमच्याकडे मोठा अनुभव असताना डीईओची पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यात आली. हा अन्याय असून तो सहन केला जाणार नाही.
- पुष्पक राठोड (१७)
.......................
कोरोनाकाळात डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदावर काम करण्याचा मोठा अनुभव पाठीशी आहे. असे असताना कोरोनाचे संकट संपताच आम्हाला कार्यमुक्त करून घरचा रस्ता दाखविण्यात आला. काहीच दिवसांत बाह्ययंत्रणेमार्फत हीच पदे आरोग्य विभागाकडून भरण्यात आली. या अन्यायामुळे आम्ही पुरते खचलो आहोत. त्यामुळेच आंदोलनाचा निर्धार करण्यात आला आहे.
- वैभव खोडवे
.....................
कोरोनाचे संकट ऐरणीवर असताना आम्ही स्वत:च्या जिवाची पर्वा न करता बाधितांच्या सेवेला प्रथम प्राधान्य दिले. कोरोनाकाळात कर्तव्य बजावत असताना एकही सुटी न घेता अविश्रांत जबाबदारी पार पाडली; मात्र कोरोनाचे संकट निवळत असल्याचे लक्षात येताच आरोग्य विभागाने कुठलाही विचार न करता कार्यमुक्त करून क्षणात बेरोजगार करून टाकले.
- प्रशांत वानखेडे