वीज चोरांना महावितरणाचा शॉक
By Admin | Updated: March 28, 2015 01:47 IST2015-03-28T01:47:23+5:302015-03-28T01:47:23+5:30
पाच वर्षात २ लाख चोरांवर कारवाई.

वीज चोरांना महावितरणाचा शॉक
बुलडाणा : महावितरणच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या भरारी पथकाने गत पाच वर्षात राज्यभरात २ लाख १९ हजार वीज चोरांना कारवाईचा शॉक दिला. त्यांच्याकडून १४८.९७ कोटी रूपयांचा दंड महावितरणाने वसूल केला.
वीज हानी कमी करणे, वीज पुरवठय़ाच्या यंत्रणेमध्ये सुधारणा करणे, तसेच वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमरावती, औरंगाबाद, बारामती, भांडूप, जळगाव, कल्याण, कोकण, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या तेरा परिक्षेत्रात महावितरणाच्या दक्षता व सुरक्षा विभागाकडून ३६ स्वतंत्र भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांकडून मिळणार्या माहितीच्या आधारे, तसेच संशयित ग्राहकांची तपासणी या भरारी पथकांनी केली. त्यातून थेट वीज चोरी आणि अणि अनधिकृत वीज वापराची अनेक प्रकरणे पाच वर्षात उघडकीस आली.
*वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या मिटरचे वाचन स्वयंचलित करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्याने सुरु केली. अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून एकाच ठिकाणाहून ठराविक विभागातील मिटरचे वाचन शक्य होणार आहे. मिटर वाचनाबरोबरच मिटरमध्ये फेरफार करणार्या संशयीत ग्राहकांची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे अशा वीज चोरांवर कारवाई करणे सहज शक्य होणार आहे.
पाच वर्षात झालेली कारवाई
वर्ष वीज चोरीची प्रकरणं वसुली (कोटी)
२00९-१0 ५0६९८ ५४.२४
२0१0-११ १७२६९ १४.२४
२0११-१२ ४७६३३ २८.२६
२0१२-१३ ७३८५७ ३८.0९
२0१३-१४ ३0२७५ १४.१0