वारा सिंचन प्रकल्पाला जूनपूर्वी वीजपुरवठा!
By Admin | Updated: March 19, 2016 01:11 IST2016-03-19T01:11:28+5:302016-03-19T01:11:28+5:30
वाशिम जिल्हाधिका-यांनी दिली ग्वाही; पाणी असताना विजेअभावी उद्भवला सिंचनाचा प्रश्न!

वारा सिंचन प्रकल्पाला जूनपूर्वी वीजपुरवठा!
देपूळ (जि. वाशिम): : वारा जहागीर सिंचन प्रकल्पस्थळी रखडलेले वीजपुरवठय़ाचे काम विनाविलंब मार्गी लावून जूनपूर्वी शेतकर्यांना सुरळीत वीजपुरवठा दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. बुधवार, १६ मार्च रोजी प्रकल्पस्थळी आयोजित जलजागृती सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
वारा जहागीर बृहद् सिंचन प्रकल्पामध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कर्ज काढून पाइप लाइनचे काम पूर्ण केले; मात्र वीजपुरवठा व विद्युत रोहित्र देण्यास महावितरणने टाळाटाळ चालविली आहे. दरम्यान, जलाशयामध्ये जलसाठा असताना केवळ विजेअभावी सिंचन करणे अशक्य होत असल्याने आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, अशी फिर्याद संबंधित शेतकर्यांनी वारा जहागीर येथील जलजागृती कार्यक्रमामध्ये सामुहिकरित्या जिल्हाधिकार्यांकडे मांडली.
वारा जहागीर येथील सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे दुष्काळात होरपळत असणार्या शेतकर्यांनी खासगी कर्ज काढून तथा पत्नी, मुलींचे दागिने विकून पाइप लाइनचे ८0 टक्के काम पूर्ण केले.
प्रकल्पाचा उत्तरेकडील भाग हा महावितरणच्या मंगरुळपीर उपविभाग अंतर्गत येतो. आसेगावच्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र परिसरातील सुमारे १00 शेतकर्यांनी दोन महिन्यांपासून वीजपुरवठय़ासाठी अर्ज केले. हे अर्ज अस्ताव्यस्त अवस्थेत आसेगाव येथील कार्यालयात धूळ खात पडले असून, एकही विद्युत रोहित्र मंजूर झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रकल्पाचा दक्षिणेकडील भाग हा अनसिंग उपकेंद्र अंतर्गत येत असून, या विभागाने ८ नवीन विद्युत रोहित्रे मंजूर केली आणि कोटेशन देऊन शेतकर्यांकडून पैसे भरून घेतले; परंतु वीजपुरवठा अद्याप त्यांना मिळालेला नाही.