लाउडस्पीकर, हॅन्डबिल, जाहीर सभा, वैयक्तिक टीकाशिवाय निवडणूक प्रचार
By Admin | Updated: July 25, 2015 01:38 IST2015-07-25T01:38:39+5:302015-07-25T01:38:39+5:30
अनसिंग येथे ठराव; उमेदवारांनी सभेत घेतला निर्णय.

लाउडस्पीकर, हॅन्डबिल, जाहीर सभा, वैयक्तिक टीकाशिवाय निवडणूक प्रचार
अनसिंग (जि. वाशिम ) : वाशिम तालुक्यात महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्या अनसिंग गावात १७ सदस्य ग्रामपंचायत असून शुक्रवारपासून प्रचाराला सुरुवात करताच विरोधी दोन्ही गटांतील नेते व इतर उमेदवारांनी शुक्रवारी गांधी चौकामध्ये सकाळी १0 वाजता बैठक घेवून लाउडस्पीकर, हॅन्डबिल, जाहीर सभा, वैयक्तिक टीका शिवाय निवडणूक लढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अनसिंग येथील ग्रामपंचायत निवडणूक परिसरातील ५0 खेड्यामधील प्रतिष्ठेची व महत्वपूर्ण मानल्या जाते. या निवडणुकीकडे परिसरातील सर्व जनतेचे तसेच शहरातील नेतेमंडळीचे लक्ष वेधलेले असते. निवडणुकीदरम्यान वायफळ होणारा खर्च, तसेच वाद विवाद टाळून शांततेच्या मार्गाने गावातील निवडणूक पार पडावी याकरीता दोन्ही गटातील पॅनलचे नेते, उमेदवार, इमरान कुरेशी (उपसभापती पं.स. वाशिम), जि.प. सदस्य नथ्थुजी कापसे, सरपंच चिंतामण लाडगे, विनोद मानधने, जगदीश राजे, जयंत हुरकट, शे. जलीलभाई, माधवराव ठाकरे, इरफान पठाण, कुंडलिक ढगे, शे. अली, नितीन चव्हाण, शे. चाँद शे. रशिद, रामराव घोलप, महेमुदखाँ मन्सुरखाँ, ठाणेदार डि.एम. घुगे व दोन्ही गटातील महत्वाच्या नेत्यांनी एकत्रित सकाळी गांधी चौकामध्ये विनोद मानधने यांच्या प्रतिष्ठानवर बैठक घेवून ठाणेदार डि.एम. घुगे यांच्या उपस्थितीत बैठक घेवून त्यामध्ये यावर्षीपासून शांततेच्या वातावरणात कुठलाही भेदभाव, चेष्ठा, निंदा, जाहीर सभा, वैयक्तिक टिका, लाउडस्पीकर, हॅन्डबिल, बॅनर, होल्डींग यांचा प्रचार करण्यासाठी वापर करण्यात येणार नाही. तसेच रात्री १0 वाजताच्या आतमध्ये सर्व प्रचार सुरु राहील. निवडणुकीचा प्रचार केवळ घरोघरी जावून डमी पत्रिका व बॅचेस छापून केल्या जाईल, असा लेखी ठराव घेवून उपस्थित सर्वांनी त्यांच्यावर सहय़ा करुन ठरविले. तसेच या निर्णयाबाबात दोन्ही गटाच्या वतीने पोलीस अधिक्षक विनिता साहू, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके, तहसिलदार ठाणेदार यांना लेखी ठराव देवून कळविले आहे. या निवडणुकीमध्ये अवैध दारुचा वापर होणार नाही. तसेच विजयी झाल्यानंतर गावात मिरवणूक काढण्यात येणार नाही, असा सुद्धा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.