नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर?
By Admin | Updated: June 5, 2014 00:58 IST2014-06-05T00:57:38+5:302014-06-05T00:58:51+5:30
वाशिम जिल्ह्यातील ३ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे

नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर?
वाशिम : जिल्ह्यातील ३ नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक जून महिन्यात होत आहे; मात्र या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वाशिम सह मंगरूळपीर व कारंजा येथील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जून महिन्यात संभावित आहे. लोकसभा निवडणूकीत आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. अशातच लोकसभा निवडणुकीची आआचारसंहिता आणि आता शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता सुरू झाल्याने नगराध्यक्षांना कामे करणे कठीण झाले आहे. चार महिन्यांचा कालावधी आचारसंहि तेमध्ये गेल्याची बाब बहुतांश नगराध्यक्षांनी सरकारकडे विशद केली आहे. आचारसंहितेच्या काळात जी काही विकास कामे करता आली नाही ती कामे पूर्ण करता यावी यासाठी जूनमध्ये होणार्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुकांनंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. नगराध्यक्षांच्या या मागणीवर सरकार अनुकूल असुन हा विषय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केल्यानंतर यासंदर्भात अधिसूचना काढण्याची तयारीदेखील शासनाची असल्याची माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याशिवाय गत्यंतर नाही, असा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर आहे.