वाशीम जिल्हा नियोजन समिती निवडणूक
By Admin | Updated: August 27, 2014 00:13 IST2014-08-27T00:13:16+5:302014-08-27T00:13:16+5:30
इच्छूकांचे भाग्य मतपेटीत बंद

वाशीम जिल्हा नियोजन समिती निवडणूक
वाशीम : जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी २६ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या एकूण ५२ सदस्यांपैकी ५१ सदस्यांनी मतदानाच्या प्रक्रीयेत भाग घेतल्याने निवडणूकीत ९८ टक्के मतदान झाले. जिल्हा विकास व नियोजन समितीमध्ये नागरी क्षेत्रामधून सर्वसाधारण प्रवर्गातील १ व ग्रामीण क्षेत्रातून २0 सदस्य मिळून २१ सदस्य निवडून देणे अपेक्षीत होते. जिल्हा नियोजन समितीच्या २१ पदासाठी विहित मुदतीत २९ जणांचे अर्ज वैध ठरल्याने सदस्यत्वासाठी चूरस असल्याचे जवळपास निश्चीत झाले होते. नामनिर्देशनपत्र छाणनिनंतर नागरी भागातील १ तर ग्रामीण भागातील ५ अर्ज अवैध ठरले. नागरी भागातील उर्वरित चारही इच्छूकांचे अर्ज वैध होते. ग्रामीण भागातील जे ३७ अर्ज वैध ठरले होते त्यापैकी काहींनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्याने वैध अर्जापैकी २५ जणांचे प्रत्येकी एक असे २७ अर्ज नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणूकिसाठी पात्र ठरले होते. अनुसुचित जातीमधील २, अनुसुचित जाती स्त्री २, अनुसुचित जमाती १, अनुसुचित जमाती स्त्री १ ,नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३ या ९ जागांवरही एकापेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज नसल्याने त्या उमेदवारांची निवड अविरोध आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडून द्यावयाच्या ३, सर्वसाधारण ५, सर्वसाधारण स्त्रि ३ अशा एकूण ११ जागांसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त अर्ज दाखल असल्याने या जागांसाठी २६ ऑगस्ट रोजी निवडणूक झाली. नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्ग, सर्वसाधारण महिला प्रवर्ग मिळून ११ सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक झाली. जिल्हा परिषदेच्या एकूण ५२ पैकी ५१ सदस्यांनी मतदान केल्याची नोंद झाली. मालेगाव तालुक्यातील राजूरा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रत्नप्रभा घुगे या मतदानासाठी गैरहजर राहिल्या.