विमाशि संघाची निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षणाखाली होणार
By Admin | Updated: February 19, 2015 00:21 IST2015-02-19T00:21:13+5:302015-02-19T00:21:13+5:30
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय.

विमाशि संघाची निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षणाखाली होणार
लोणार (जि. बुलडाणा): विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची प्रांतीय कार्यकारिणीची निवडणूक ही धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षणाखाली घेण्यात यावी, असा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १३ फेब्रुवारीला दिला आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही माध्यमिक शिक्षकांची एक सबळ संघटना आहे. मागील वर्षी संघटनेचे सहकार्यवाह व्ही. यू. डायगव्हाणे यांनी प्रांतीय कार्यकारिणीच्या निवडणुकीचा कार्यक्रम लावला होता. तथापि, आजवरचा निवडणुकीचा इतिहास पाहता, डायगव्हाणे यांच्या गटाकडून ही निवडणूक योग्यरीतीने घेण्यात येत नाही. यासाठी खोटरे यांच्या गटाकडून न्यायालयात धाव घेऊन त्यावर स्थगनादेश मिळविला होता तसेच खोटरे गटाकडून ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षणाखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर न्यायालयाने डायगव्हाणे गटाला चपराक देत विमाशि संघाच्या प्रांतीय कार्यकारिणीची निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षणाखाली घेण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. यामुळे ही निवडणूक आता पारदर्शक असल्याने शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.