निवडणूकीच्या प्रचारात महिला कार्यकर्त्या आघाडीवर
By Admin | Updated: October 5, 2014 01:40 IST2014-10-05T01:40:44+5:302014-10-05T01:40:44+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी

निवडणूकीच्या प्रचारात महिला कार्यकर्त्या आघाडीवर
वाशिम : चूल आणि मूल या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील तळागाळातील स्तरावर रोवला आहे. मात्र, विधानसभा आणि लोकसभेच्या स्तरावर झेप घेऊ पाहणार्या महिलांना पुरूषी वरचष्मा असलेल्या राजकारणाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच अडकवून ठेवले आहे. राजकीय पक्ष सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी नापास ठरविलेल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष प्रचारासाठी खात्रीचे नाणे म्हणून वापरताना दिसत आहेत.विशेष बाब म्हणजे प्रचारात महिला या पुरूष कार्यकर्त्यांपेक्षा आघाडीवर आहेत. राजकारणाचा पाया असणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव आणि तालुका पातळीवर सर्व अडचणींना सर्मथपणे तोंड देत महिलांनी राजकारण आणि विकासाची सांगड घालत अत्यंत उत्तम कामगिरी बजावली आहे. या कामगिरीच्या बळावर राजकारणात त्यांनी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. परंतु त्यांच्या वाटा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिकेतच अडविल्या गेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेतील महिलांचा टक्का वाढायला तयार नाही. जिल्ह्यात एकूण आठ लाख ७४ हजार ६८८ मतदार आहेत. त्यांपैकी चार लाख ३६ हजार १३५ मतदार हे पुरुष आहेत, तर तब्बल चार लाख ११ हजार ३५७ मतदार महिला आहेत. हा आकडा पाहिल्यास सुमारे ४५ टक्क्यांहून अधिक मतदार महिला आहेत. ही बाब लक्षात घेऊन या व्होट बँकेला आपल्याकडे ओढून घेण्यासाठी राजकीय पक्षांना महिला कार्यकर्त्यांची फळी हवी आहे. प्रचारात महिलांची ही फळी उभी करण्यासाठी राजकीय पक्षांनी महिला आघाड्यांची स्थापना करणे, महिला बचतगटांची उभारणी करणे, याशिवाय प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्या महिलांची मोठी फळी उभी करण्याचे काम केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील वाशिम, कारंजाव रिसोड या मतदारसंघात तेच चित्र दिसून येत आहे.