गॅस सिलिंडर स्फोटातील जखमी वृद्ध मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:40+5:302021-09-10T04:49:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : व्यावसायिक दुकानाच्या बांधकामावर चौकीदार म्हणून काम करीत असताना गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे जखमी झालेल्या व ...

गॅस सिलिंडर स्फोटातील जखमी वृद्ध मदतीपासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : व्यावसायिक दुकानाच्या बांधकामावर चौकीदार म्हणून काम करीत असताना गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे जखमी झालेल्या व एका डोळ्याला कायमचे अपंगत्व आलेल्या वृद्धाला अद्यापही शासकीय मदत मिळाली नाही.
वाशिम तालुक्यातील जांभरुण परांडे येथील रहिवासी सखाराम कांबळे हे शहरातील श्री शिवाजी शाळेसमोर असलेल्या एका दुकानाच्या बांधकामावर चौकीदार म्हणून दीड वर्षापासून काम करीत होते. तसेच त्यांची पत्नी लक्ष्मी कांबळे ही बांधकामावर पाणी मारण्यासाठी कार्यरत होती. या कामासाठी कांबळे यांना ६ हजार मासिक वेतन दुकानमालक, तर पाणी मारण्यासाठी अतिरिक्त १०० रुपये रोज ठेकेदारांकडून मिळत होता. गत ३० जानेवारी २०२१ रोजी कांबळे हे एकटे बांधकामाच्या ठिकाणी आराम करीत असताना तेथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आग लागून या आगीत सखाराम कांबळे हे गंभीर जखमी झाले तर घरातील घरगुती सामानासह बँकेचे पासबुक, आधारकार्ड, रेशनकार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रेही जळून खाक झाली. तर या स्फोटात कांबळे यांचे अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले तर त्यांच्या एका डोळ्यालाही कायमचे अपंगत्व आले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी सखाराम कांबळे यांनी जिल्हाधिकारी तथा कामगार कल्याण कार्यालयाला अनेकवेळा निवेदने दिली. परंतु त्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही.