वृद्धेने दिली दहा तास मृत्यूशी झुंज
By Admin | Updated: January 23, 2016 02:05 IST2016-01-23T02:05:20+5:302016-01-23T02:05:20+5:30
दैव बलवत्तर म्हणून म्हातारीचे वाचले प्राण; बालकांनी दाखवली समयसूचकता.

वृद्धेने दिली दहा तास मृत्यूशी झुंज
शंकर वाघ / शिरपूर जैन (जि. वाशिम): पहाटेची वेळ.. ८0 वर्षीय वृद्ध महिला शौचाकरिता बाहेर जात असताना ३५ फूट खोल कोरड्या विहिरीमध्ये पडल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ७.३0 वाजेदरम्यान घडली. तब्बल दहा तास ही बाब कोणाच्याच लक्षात न आल्याने वृद्धेने मृत्यूशी झुंज दिली. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ओंकार कॉलनीतील रस्त्याच्या कडेला उघडी विहीर आहे. सदर विहिरीला कोणत्याही प्रकारचे कठडे किंवा ओटा नसल्याने येथे विहीर असल्याचे दिसून येत नाही. सध्या हिवाळयाचे दिवस असल्याने पहाट थोडी उशिराच होते. २१ जानेवारी रोजी सकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान ओंकार कॉलनी भागात राहणारी ८0 वर्षीय वृद्ध महिला सुभद्राबाई नवृत्ती जानोळकर ही सकाळी शौचास जात असताना तोल जाऊन त्यामध्ये पडली. विहीर परिसरात कोणीही राहत नसल्याने याकडे कुणाचेही लक्ष जात नव्हते. संध्याकाळ होण्याच्या आधी ५ वाजताच्या दरम्यान काही बालके या परिसरात क्रिकेट खेळण्यासाठी आले व खेळायला लागले. बराच वेळ खेळून झाल्यानंतर बॉल विहिरीच्या दिशेला गेला. तेव्हा यातील एका जणाचे लक्ष त्या म्हातारीकडे गेले. तसेच याच दरम्यान सकाळपासूनच म्हातारी दिसून येत नसल्याने नातेवाईकही शोध घेत विहिरीपर्यंंत पोहचले होते. सकाळी ७.३0 ते ५ वाजेपर्यंंत म्हातारी विहिरीत मदतीसाठी ओरडत असल्याने तिच्यामध्ये थोडाही त्राण नव्हता. तसेच विहिरीत पडल्याने तिच्या डोक्याला व हाताला मार लागला. उपस्थितांनी खाट दोर बांधून आत सोडली व म्हातारीला बाहेर काढले. बालकांच्या सतर्कतेने व वृद्धेचे दैव बलवत्तर असल्याने दहा तास मृत्यूशी झुंज देणार्या वृद्धेचे प्राण वाचले.