शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठय़ाला प्राधान्य!
By Admin | Updated: March 22, 2016 02:24 IST2016-03-22T02:24:37+5:302016-03-22T02:24:37+5:30
वाशिम जिल्हा परिषदेचे ७२ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक; मानव विकास निर्देशांक वाढविण्याचा प्रयत्न!

शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठय़ाला प्राधान्य!
वाशिम: सन २0१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक ७२ हजार रुपये शिलकीचे सादर करीत, सन २0१६-१७ च्या मूळ अंदाजपत्रकात शिक्षण, आरोग्य व पाणीपुरवठा या बाबींना प्राधान्यक्रम देण्यात आला. मानव विकास निर्देशांकात वाशिम जिल्ह्याचा सर्वांंत शेवटचा क्रमांक असून, मागासलेपणाचा ठपका पुसून काढण्यासाठी शिक्षण व आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारच्या अर्थसंकल्पीय सभेत केला.
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, सभापती सर्वश्री चक्रधर गोटे, सुभाषराव शिंदे, पानूताई जाधव यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला अधिकारी-पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर अर्थ सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी सन २0१५-१६ चे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. या वर्षात १५ कोटी ४५ लाख ७६ हजार ४६१ रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, १५ कोटी ४५ लाख ४ हजार २१३ रुपये विविध विभागांच्या योजनांवर खर्च झाल्याचे सांगण्यात आले. सन २0१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक सादर करून विविध मार्गांंनी प्राप्त होणारे उत्पन्न ४ कोटी ९ लाख ९८ हजार २२९ रुपये अंदाजित असून, विविध योजना व विभागांसाठी एकूण खर्च ९ कोटी ४४ लाख ९३ हजार ३८१ रुपये होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. कृषी २0 लाख, महिला व बाल कल्याण ३६ लाख, समाजकल्याण ६८ लाख, पशुसंवर्धन ५ लाख, पाणीपुरवठा ६२ लाख, ग्रामीण रस्ते व देखभाल १ कोटी ४0 लाख अशी तरतूद आहे. वाशिम जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक अतिशय कमी असल्याने सार्वजनिक आरोग्यासाठी १ कोटी ४0 लाख, तर शिक्षणासाठी ९0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आरोग्य, शिक्षण, शुद्ध पाणीपुरवठय़ाच्या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भरीव तरतूद केल्याचे अर्थ सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले.