‘द्वारका उत्सव’ नामशेष होण्याच्या मार्गावर!
By Admin | Updated: August 28, 2014 02:20 IST2014-08-28T02:07:29+5:302014-08-28T02:20:57+5:30
वाशिमचा द्वारका उत्सव यंत्रयुगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

‘द्वारका उत्सव’ नामशेष होण्याच्या मार्गावर!
वाशिम : एकेकाळी राज्यात प्रसिद्ध असलेला वाशिमचा द्वारका उत्सव यंत्रयुगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या उत्सवात सहभागी होणार्या नागरिकांची गर्दी व बैलांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. मूक जिवांवर आणि पर्यावरणावर प्रेम करण्याचा संदेश देणार्या या उत्सवाप्रती ओसरत असलेला उत्साह वाशिमच्या सांस्कृतिक क्षेत्रात चिंतेचा विषय बनला आहे.
१९५४ च्या पूर्वीपासून वाशिममध्ये व्दारका उत्सव अविरत सुरू असला तरी, या उत्सवातील गर्दी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिलच्या इतिहासात या उत्सवाचा उल्लेख राज्यभर प्रसिद्ध असलेला उत्सव म्हणून अभिमानाने करण्यात आला आहे. १९५४ साली वाशिममधील चंदू माळी आणि नामदेव मामा यांनी सहभाग घेवून या उत्सवास व्यापक स्वरूप दिले होते. तेव्हापासून हा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो; मात्र १0 वर्षांंपासून या उत्सवातील उत्साह हरवला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पोळय़ाच्या दुसर्या दिवशी साजरा केला जाणार्या या उत्सवाच्या माध्यमातून प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा संदेश दिला जायचा. पोळय़ाप्रमाणेच या उत्सवातही बैलांचा समावेश मोठया प्रमाणात असायचा. आधुनिक युगात बैलांची जागा ट्रॅक्टर्सनी घेतली. त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली. परिणामी, या उत्सवात सहभागी होणार्या बैलांची संख्या रोडावली.
पोळय़ाच्या दुसर्या दिवशी, २६ ऑगस्ट रोजी वाशिम शहरात व्दारका उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात बैलांची संख्या कमी दिसून आली; तथापि देवपेठ व चामुंडा देवी व्दारका उत्सव मंडळाच्या सदस्यांसह इतरही कार्यकर्त्यांंनी वर्षानुवर्षांंपासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न यावर्षीही केला.
** वाशिम येथील व्दारका महाराष्ट्रात प्रसिध्द असून, या उत्सवामध्ये पोळयाच्या दुसर्या दिवशी व्दारका निघतात. कामटया व चमकीच्या कागदापासून उंच सचित्र व्दारका उभारतात. यामध्ये दिंडी, भजनी मंडळ, लेझीम पथक सहभागी होतात. शेतकरी आपल्या बैलाला सजवून या उत्सवात सहभागी करतात. सजविलेल्या बैलांना व दिंड्यांना बक्षिसेही वाटली जातात. ठरवून दिलेल्या मार्गावरून मिरणवूक काढली जाते आणि बालाजी मंदिरासमोर महाप्रसाद होतो. या उत्सवात पूर्वी तरूण - तरूणींचाही सहभाग असायचा.