जागेअभावी ५00 घरकुलांचे प्रस्ताव धूळ खात
By Admin | Updated: August 28, 2014 02:25 IST2014-08-28T02:24:31+5:302014-08-28T02:25:39+5:30
वाशिम तालुक्यातील ५00 घरकुल पात्र लाभार्थींचे घरकुल बांधकाम अजूनही जागेअभावी प्रलंबित .

जागेअभावी ५00 घरकुलांचे प्रस्ताव धूळ खात
पांडवउमरा : वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींनी घरकुल पात्र लाभार्थ्यांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द केली आहे. त्यामधील ५00 घरकुल पात्र लाभार्थींचे घरकुल बांधकाम अजूनही जागेअभावी प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे. जागेअभावी पात्र लाभार्थी घरकुल बांधकामापासून वंचित राहत आहेत.
शासकीय जागेवर गत १२ ते १५ वर्षांपासून वास्तव्य करणार्या लाभार्थींना आठ अ मिळणे अपेक्षीत आहे. मात्र, संबंधीत लाभार्थ्यांना आठ अ मिळणे अवघड झाले आहे. दरम्यान जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी १५ जुलै २0१४ रोजी तहसील कार्यालय वाशिम येथे सावंगा जहॉगीर, पार्डी टकमोर, बिटोडा, जांभरुण महाली या गावातील घरकुल पात्र लाभार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. १८ जुलै २0१४ रोजी तहसीलदार वाशिम यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते. सदरचा प्रश्न हा पार्डी टकमोर पं.स. सर्कलमधील लाभार्थ्यांसह वाशिम पं. स. अंतर्गत येणार्या ८४ ग्रामपंचायती मधील घरकुल पात्र लाभार्थ्यांचा असून तालुक्यातील प्रतिक्षा यादीनूसार जे लाभार्थी इंदिरा आवास, रमाई आवास घरकुल योजनेस पात्र आहेत. परंतु स्वत:च्या मालकीची जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांंचे प्रस्ताव सचिवाकडून बोलावून गटविकास अधिकार्यांनी महसुल विभागाला सादर करावे, लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी वाशिम पंचायत समितीच्या माजी सभापती मधूबाला सुभाषराव चौधरी यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. घरकुल लाभार्थ्यांंना त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची जागा नसल्यामुळे थोडी अडचण येत आहे. याविषयी लवकरच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन सदर लाभार्थ्यांंचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे यांनी सांगीतले.