शासकीय इमारतींची दुरवस्था
By Admin | Updated: September 26, 2014 00:31 IST2014-09-26T00:31:39+5:302014-09-26T00:31:39+5:30
वाशिम जिल्ह्यातील तीन तालुक्यातील अनेक इमारती मोडकळीस.

शासकीय इमारतींची दुरवस्था
दादाराव गायकवाड / कारंजा लाड
वाशिम जिल्हय़ातील अनेक शासकीय इमारतीची अवस्था वाईट झाली असून, यामध्ये विविध शासकीय कार्यालयांसह, कर्मचार्यांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या सर्व इमारतीच्या डागडुजीची मागणी संबंधित विभागांकडून करण्यात आली आहे.
वाशिम जिल्हय़ातील मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात अनेक शासकीय इमारतीची अवस्था वाईट झाली आहे. यामध्ये गृह विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील क ार्यालये आणि कर्मचार्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. मंगरुळपीर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येणार्या शासकीय इमारतींमध्ये पोलिस स्टेशन आणि पोलिसांची निवासस्थाने, तहसीलदार निवासस्थान, शासकीय गोदाम, ग्रामीण रुग्णालय आणि त्यामधील कर्मचार्यांच्या निवासस्थानांची मोठय़ा प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याशिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्र माध्यमिक विद्यालय, तालुका भूमिअभिलेख कार्यालय आदि ठिकाणांवर किरकोळ दुरुस्तीही आवश्यक आहे.
मानोरा तालुक्यातही पोलिस निरीक्षक, तहसीलदार निवासस्थान, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, तसेच धान्य गोदाम आदि शासकीय इमारतींची दुरुस्ती आवश्यक झाली आहे. कारंजा येथे तहसील कार्यालयाच्या छतावरील कवेलू फुटले असून, शासकीय धान्य गोदामाच्या खिडक्यांची मोडतोड झाली आहे. तहसील कार्यालयाच्या दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावाही करण्यात आला आहे.
** सा. बां. उपविभागाकडून दुरुस्तीचे प्रस्ताव सादर
वाशिम जिल्हय़ातील मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील विविध शासकीय इमारतीच्या दुरुस्तीसंदर्भात संबंधित विभागाकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार मंगरुळपीर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या वतीने अंदाजपत्रक तयार करून दुरुस्तीचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता वाशिम यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंगरुळपीर यांच्याकडून मंगरुळपीर तालुक्यातील एकूण २७, तर मानोरा तालुक्यातून एकूण १२ शासकीय इमारतीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून जुलै २0१४ ला सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठांकडे पाठविण्यात आले असल्याचे सार्वजनिक बांधक ाम उपविभागाकडून सांगण्यात आले.