शेतक-यांना दुष्काळी मदतीची आस
By Admin | Updated: December 30, 2015 01:56 IST2015-12-30T01:56:57+5:302015-12-30T01:56:57+5:30
केंद्राची मदत जाहीर; गतवर्षी वाशिम जिल्ह्याला मिळाले होते ५७.५३ कोटी.

शेतक-यांना दुष्काळी मदतीची आस
वाशिम : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारचा निधी जाहीर झाला असून, महाराष्ट्रासाठी ३0५0 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे. यापैकी वाशिम जिल्ह्याला किती पॅकेज मिळणार, याकडे जिल्ह्यातील शेतकर्यांचे लक्ष लागून आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दुष्काळाबाबत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्राला ३0५0 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला. वाशिम जिल्ह्याला सलग तिसर्या वर्षी दुष्काळसदृश स्थितीचा फटका बसला आहे. दुष्काळाबाबत तलाठी, महसूल विभाग, नजर आणेवारी, सुधारित आणेवारी, केंद्रीय पथकाची पाहणी असा शासकीय सोपस्कार पार पडला असून, सर्व अहवाल पाहता जिल्ह्याला भरीव स्वरुपाचा दुष्काळी मदत निधी मिळण्याची शेतकर्यांना अपेक्षा आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशापेक्षा अधिक होती; मात्र सत्ताधारी आमदारांचा पाठपुरावा आणि विरोधकांचे आंदोलन यामुळे जिल्ह्यातील सर्व ७९३ महसुली गावांची सुधारित पैसेवारी ४४ पैसे जाहीर झाली होती. कारंजा ४२, मानोरा ४५, वाशिम ४३, मंगरुळपीर ४४, रिसोड व मालेगावची सुधारित पैसेवारी प्रत्येकी ४६ अशी आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्याची अपेक्षा होती; मात्र तसे झाले नसल्याने शेतकर्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता दुष्काळी मदत निधी जाहीर झाल्याने जिल्ह्याला किती निधी मिळणार, त्याचे निकष काय, पॅकेजचे स्वरुप काय, आदी प्रश्नांच्या उत्तराकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे.