चालकाला गुंगारा देवून पळविली कार
By Admin | Updated: March 22, 2017 17:14 IST2017-03-22T17:14:10+5:302017-03-22T17:14:10+5:30
खासगी कार भाड्याने घेऊन जात असताना चालकाला पाणी आणण्यासाठी उतरवून कार पळवून नेल्याची घटना शहरातील अकोला नाका परीसरात मंगळवारी घडली.

चालकाला गुंगारा देवून पळविली कार
वाशिम : औरंगाबाद येथे कामानिमित्त जाण्यासाठी खासगी कार भाड्याने घेऊन जात असताना चालकाला पाणी आणण्यासाठी उतरवून कार पळवून नेल्याची घटना शहरातील अकोला नाका परीसरात मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेला कार चालक अमजद खॉ कदीर खॉ याने पोलिसांनी तक्रार दिली की, जिंतूर येथील शे.खलील शे. फकरु यांच्या मालकीच्या एम.एच.२२ यू -७४०१ या क्रमांकाच्या कारवर चालक म्हणून काम करतो. दरम्यान, जिंतूर येथील खासगी वाहन तळावर एका युवकाने महत्वाच्या कामासाठी औरंगाबाद येथे जायचे असल्याचे सांगून गाडी भाड्याने ठरविली. सकाळी ७ वाजता जिंतूर येथून निघून सकाळी १० वाजता वाशिममधील अकोला नाका परिसरात पोहचलो. त्यावेळी गाडीतील इसमाने नातेवाईक महिला येत असल्याचे सांगून गाडी थांबविण्याचे सांगत पिण्यासाठी पाणी बॉटल घेण्याचे सांगितले. त्यामुळे जवळच असलेल्या दुकानवर पाणी आणण्यासाठी गेलो असता सदर युवकाने इरटीका कंपनीची ११ लाख रुपये किंमतीची कार घेवून तेथून पोबारा केला. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करुन प्रकरण तपासात घेतले आहे.