ठिबक सिंचन योजनेचे अनुदान अद्याप अप्राप्त

By Admin | Updated: March 7, 2016 02:18 IST2016-03-07T02:18:55+5:302016-03-07T02:18:55+5:30

शेतकरी हवालदिल: १५.२२ कोटींच्या अनुदान रकमेची शेतक-यांना प्रतीक्षा.

Drip irrigation scheme subsidy still untouched | ठिबक सिंचन योजनेचे अनुदान अद्याप अप्राप्त

ठिबक सिंचन योजनेचे अनुदान अद्याप अप्राप्त

वाशिम: ठिबक व तुषार सिंचन योजनेंतर्गतचे जवळपास ९७00 शेतक-यांचे १५.२२ कोटी रुपयांचे अनुदान एका वर्षानंतरही शेतकर्‍यांना मिळाले नसल्याने रोष व्यक्त होत आहे.
शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजनेंतर्गतच्या अनुदानातून शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, अनुदानाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या समस्येत अधिकच भर पडत असल्याचे दिसून येते. विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकर्‍यांना अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शेतकर्‍यांची निवड केली जाते. २0१४-१५ या वर्षात वाशिम जिल्ह्यातील ९ हजार ७४६ शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यामध्ये मानोरा तालुक्यातील ८३0 शेतकर्‍यांचा समावेश आहे. या सर्व पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना १६ कोटी २८ लाख ३0 हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागामार्फत मिळणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल एका वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही. अवर्षण, अतवृष्टी, गारपीट आणि अनियमित पाऊस यामुळे आधीच अवर्षण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अनुदानाअभावी सिंचन सुविधा उपलब्ध करणे कठीण होऊन बसले आहे. ठिबक व तुषार संचासाठी जिल्ह्यातील ९ हजार ७४६ शेतकर्‍यांनी गतवर्षी ऑनलाइन अर्ज केले होते. २0१५-१६ हे आर्थिक वर्ष संपत असतानाही शेतकर्‍यांना अनुदान मिळत नसल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अगोदरच तीन-चार वर्षांपासून निसर्गाची साथ नाही. अशातच शासनही अनुदानाची रक्कम देत नसल्याने शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडत आहे. दरम्यान, ठिबक व तुषार सिंचन योजनेंतर्गतचे अनुदान शेतकर्‍यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून माजी जिल्हा परिषद सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे व भारिप-बमसंचे नेते युसूफ पुंजानी यांनी शनिवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाला निवेदन दिले. मानोरा तालुका व जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असतानाच, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाने शेतकर्‍यांना हवालदिल केले आहे. कमी पावसातही शेतकरी तुषार किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेती ओलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अनुदान मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचा आरोप हेमेंद्र ठाकरे व युसूफ पुंजानी यांनी केला. मानोरा तालुक्यातील लाभार्थींंनी उसणवारीवर सिंचनाची सुविधा उपलब्ध केली आहे. आता सिंचन साहित्याचे अनुदान मिळत नसल्याने उसणवारीची परतफेड कशी करावी? या प्रश्नाने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. शासनकर्त्यांंनी शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा हेमेंद्र ठाकरे व युसूफ पुंजानी यांनी दिला.

Web Title: Drip irrigation scheme subsidy still untouched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.