वाशिम जिल्ह्यात घरगुती वीज ग्राहकांकडे २१ कोटींची थकबाकी!
By Admin | Updated: February 18, 2017 03:18 IST2017-02-18T03:18:38+5:302017-02-18T03:18:38+5:30
महावितरण आर्थिकदृष्ट्या तोट्यात ; वसूलीकडे दुर्लक्ष करणार्या कर्मचार्यांच्या फेब्रूवारीच्या पगारीवर येणार गंडांतर

वाशिम जिल्ह्यात घरगुती वीज ग्राहकांकडे २१ कोटींची थकबाकी!
सुनील काकडे
वाशिम, दि. १७- जिल्ह्यातील महावितरणच्या ग्राहकांकडे २१ कोटी ३२ लाख रुपये थकबाकी आहे. यासह गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेली कृषीपंपाची रक्कमही २६४ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या तोट्यात सापडले असून वाट्टेल ते करा; पण घरगुती ग्राहकांकडील थकबाकी प्राधान्याने वसूल करा, अन्यथा फेब्रूवारी महिण्याचा पगार कपात केला जाईल, असा सज्जड दम वरिष्ठ अधिकार्यांनी आपल्या अधिपत्याखालील कर्मचार्यांना भरल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात महावितरणचे ९ हजार ४७२ थकबाकीदार ग्राहक असून त्यांच्याकडे ५ कोटी ५४ लाख ६३ हजार रुपये थकबाकी आहे. मालेगाव तालुक्यात ९ हजार ५१५ ग्राहकांकडे ४ कोटी १४ लाख ५0 हजार, रिसोड तालुक्यात ८ हजार ५९८ ग्राहकांकडे ३ कोटी ९९ लाख १५ हजार, मंगरूळपीर तालुक्यात ५ हजार ३१२ ग्राहकांकडे २ कोटी २३ लाख ३९ हजार, मानोरा तालुक्यात ८ हजार २३२ ग्राहकांकडे २ कोटी १ लाख ४८ हजार; तर कारंजा तालुक्यातील ७ हजार ६३९ ग्राहकांकडे ३ कोटी ३९ लाख ७६ हजार, यानुसार ४८ हजार ७६८ थकबाकीदार ग्राहकांकडे २१ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे.
त्यापैकी महावितरणने विशेष सवलत देवून अंमलात आणलेल्या नवप्रकाश योजनेचा लाभ घेत गेल्या चार महिण्यांत सुमारे ३00 ग्राहकांनी ११ लाख रुपयांची थकबाकी अदा केली आहे. मात्र, ही वसूल झालेली रक्कम अगदीच कमी असून उर्वरित ग्राहकांकडील २१ कोटी २२ लाख रुपये थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागत आहे.
वाशिम जिल्ह्यात वाढत चालेली थकबाकी वसूल करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व अभियंते, जनमित्रांना पत्र देण्यात आले असून जे ग्राहक थकबाकी अदा करण्यास टाळाटाळ करतील, त्यांचा वीजपुरवठा विनाविलंब खंडित करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत ग्राहकांसोबतच कामाकडे दुर्लक्ष करणार्या कर्मचार्यांचीही हयगय केली जाणार नाही.
विजय मेश्राम
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम