डॉक्टरांची हलगर्जी बेतली महिलेच्या जीवावर
By Admin | Updated: July 28, 2014 01:51 IST2014-07-28T01:43:19+5:302014-07-28T01:51:45+5:30
मालेगाव येथील घटना

डॉक्टरांची हलगर्जी बेतली महिलेच्या जीवावर
मालेगाव : उपचारासाठी डॉक्टरकडे गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मालेगाव येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार कविता प्रमोद चव्हाण ही गर्भवती महिला २६ जुलैला मालेगाव येथील जाजू रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर पोटातील गर्भ खराब झाला असल्याचे चव्हाण यांच्या नातेवाइकांना सांगितले.
त्यानंतर चव्हाण कुटुंबीयांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संमतीनेच डॉक्टरांनी गर्भपाताची प्रक्रिया सुरू केली; मात्र ही प्रक्रिया करीत असताना नेमका डॉक्टरांचा हलगर्जीपणा झाला. गर्भपातानंतर कविताचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा त्यांचे अंग थंड पडले होते. एवढेच नव्हे तर त्या बेशुद्धावस्थेत पडून होत्या. चव्हाण कुटुंबीयांनी ही बाब डॉक्टरांच्या कानावर घातली. त्यानंतर डॉ. जाजू यांनी कविताला उपचारासाठी तत्काळ वाशिम येथे हलविण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, मालेगाववरून येताना रस्त्यातच कविताची प्राणज्योत मालविली. या प्रकरणी विनोद विठ्ठलराव चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने त्यांचा दवाखाना सील करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे ठाणेदारांनी सांगितले.