डॉक्टरांचा अनुशेष, भौतिक असुविधांचा रुग्णांना फटका

By Admin | Updated: April 21, 2017 01:19 IST2017-04-21T01:19:34+5:302017-04-21T01:19:34+5:30

अनसिंग ग्रामीण रुग्णालयात सुविधांची प्रतीक्षा!

Doctors' backlog, physical disorders affect patients | डॉक्टरांचा अनुशेष, भौतिक असुविधांचा रुग्णांना फटका

डॉक्टरांचा अनुशेष, भौतिक असुविधांचा रुग्णांना फटका

संतोष वानखडे - वाशिम
वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालल्याने आणि ग्रामीण रुग्णालयांत भौतिक असुविधा असल्याने आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. २५२ पैकी तब्बल १६३ पदांचा अनुशेष असून, ट्रॉमा केअर युनिटमध्ये १५ पैकी केवळ तीन-चार डॉक्टरांची ‘तात्पुरती’ सेवा सुरू आहे.
नागरिकांना संपूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंदे्र, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रुग्णालयांत आवश्यक त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्याही निश्चित करण्यात आलेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात २०० खाटांनुसार वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरण्याला शासनाने मंजुरी दिलेली आहे; मात्र तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या कारणावरून सदर पदे अद्याप भरण्यात आली नाहीत. जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी (चिकित्सा), निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क), स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (भिषक), अस्थिरोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, चर्मरोग तज्ज्ञ, क्षयरोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, शरीरविकृती चिकित्सक अशी प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांची (वर्ग एक) १६ पैकी तब्बल १३ पदे रिक्त आहेत. वर्ग-दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १६ पदे मंजूर असून, दंत शल्यचिकित्सक व चार वैद्यकीय अधिकारी अशी पाच पदे रिक्त आहेत. वर्ग-३ मध्ये ८० पदे मंजूर असून, ३० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रशासनातर्फे शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप शासनाकडून पदे भरण्याला हिरवी झेंडी मिळाली नाही. काही पदांवर कायमस्वरुपी म्हणून येण्यास तज्ज्ञ डॉक्टर उत्सुक नाहीत. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने तात्पुरती सेवा घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. डॉक्टरांच्या अनुशेषाप्रमाणेच भौतिक असुविधा, काही ठिकाणी औषधींचा तुटवडा आदींचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेली श्वान दंश लस बहुतांश ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नसल्याची माहिती आहे. अनसिंग, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयांत भौतिक सुविधांचा अभाव व आवश्यक ती सर्व उपकरणे नसल्याचा फटकादेखील रुग्णांना बसत आहे.

ट्रॉमा केअर युनिटला तज्ज्ञ डॉक्टरांची प्रतीक्षा !
अपघात व कठीण प्रसंगी गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे म्हणून ट्रॉमा केअर युनिटची सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध केली. या युनिटमध्ये अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, बधिरिकरण तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी प्रत्येकी एक अशी एकूण तीन पदे भरण्यात आली. एकूण १५ पैकी जवळपास १० पदे रिक्त आहेत. काही कंत्राटी पदांची तात्पुरती सेवा आणखी तीन-चार महिन्यांपर्यंत सुरू ठेवण्याला राज्याच्या आरोग्य विभागाने नुकतीच मंजुरात दिली आहे. ट्राम केअर युनिटला कायमस्वरुपी डॉक्टर मिळणे आवश्यक आहे.

Web Title: Doctors' backlog, physical disorders affect patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.