तपासणीविना १४ व्या वित्त आयोगाचा निधी देऊ नका!
By Admin | Updated: April 2, 2016 01:20 IST2016-04-02T01:20:22+5:302016-04-02T01:20:22+5:30
मालेगाव पं. स. पदाधिका-यांचा एल्गार.

तपासणीविना १४ व्या वित्त आयोगाचा निधी देऊ नका!
मालेगाव (वाशिम) : तपासण्याविना चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचे देयक काढण्याला गटविकास अधिकार्यांनी पायबंद घालावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मालेगाव पंचायत समिती उपसभापती कल्पना अंभोरे यांच्या नेतृत्वात समस्त पं.स. सदस्यांनी गुरुवारी गटविकास अधिकार्यांना दिला.
चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र काही ग्रामपंचायतच्या विकास कामांची पूर्तता तथा मोजमापांचे मूल्यांकन आणि काम पूर्णत्वास गेल्याचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच १४ व्या वित्त आयोगाचा निधी परस्पर विकास कामांचे नावावर उचल केल्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी श्वेता काळे यांचे लक्षात आले होते. तेव्हा काळे यांनी संबंधित बँकांना ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगाचा निधी देण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रभारी गटविकास अधिकारी महागावकर यांनीही हेच धोरण सुरु ठेवले. मात्र, या कामात पारदर्शकता असावी, या भूमिकेतून मालेगाव पंचायत समितीचे उपसभापती कल्पना विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात आणि सभापती कुसुम लबडे यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पं. स. सदस्य दीपक राऊत, गजानन शिंदे, ज्ञानबा सावले, संजयराव देशमुख, उद्धवराव राऊत, सतीश माने, रत्नमाला उंडाळ, रुख्माबाई दहात्रे, नंदाबाई संजय पवार, माजी उपसभापती शिवाजी बकाळ, छाया गजानन शिंदे, रेणुका गजानन लोखंडे, शिल्पा पंकज देशमुख, मंगला धन्दरे, मंगला गवई, अन्नपूर्णा दीपक भुरकाडे आदी सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी तपासणी व नियमानुसार काम झाल्याची अधिकारी-पदाधिकारी मंडळींनी खातरजमा केल्यानंतरच निधी देण्यावर सदस्य ठाम होते.