वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांचा लोंढा
By Admin | Updated: August 23, 2014 02:10 IST2014-08-23T01:02:48+5:302014-08-23T02:10:07+5:30
काँग्रेस ४२, रा.काँ. १२, भाजपा १३, मनसे १२ व शिवसेनेचे १५ इच्छुक उमेदवार.

वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांचा लोंढा
नंदकिशोर नारे / वाशिम
वाशिम: जिल्हय़ातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचा लोंढा दिसत असून, सर्वच इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून निवडणूक लढविण्यासाठी तयारी दर्शवित आहेत.
जिल्हय़ातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास महायुती, आघाडीतर्फे मतदारसंघ ठरलेले असताना जेथे काँग्रेसची दावेदारी आहे तेथे राष्ट्रवादी तर राष्ट्रवादीच्या ठिकाणी काँग्रेस दावेदारी करीत आहे. असा प्रकार राजकीय पक्षात सर्वत्र असल्याने या प्रकारामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचा लोंढा मोठया प्रमाणात दिसून येत आहे.
जिल्हय़ातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्यावतीने ४२ इच्छुक उमेदवार आहेत. तसेच राष्ट्रवदी काँग्रेसच्यावतीने तिन्ही विधानसभा मतदारसंघात १२, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १२, भाजपाच्यावतीने निवडणूक लढण्यासाठी मोठी गर्दी दिसत असून, प्रबळ इच्छुक दावेदार म्हणून १३ जणांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडे कारंजा विधानसभा मतदारसंघ असून, त्या ठिकाणी १५ जण इच्छुक आहेत. वाशिम व रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेतर्फे इच्छुकांचे नाव पुढे आले नसल्याची माहिती आहे.
सर्वाधिक २९ इच्छुक उमेदवार वाशिम मतदारसंघातील असून, यापैकी अनेकांचे मुंबई येथे मुलाखतीसुद्धा झाल्या आहेत. वाशिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ३२, कारंजात ८, रिसोडात २ उमेदवार इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाशिम विधानसभा मतदारसंघात ५, कारंजा विधानसभा मतदारसंघात ५ तर रिसोड विधानसभा मतदारसंघात २ इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाच्यावतीने वाशिम विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी असून, प्रबळ दावेदार म्हणून ७ इच्छुक उमेदवारांचे नावे जोरात चालू आहेत. कारंजा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने येथे भाजपाच्यावतीने इच्छुकांची गर्दी दिसून येत नसली तरी शिवसेनेच्यावतीने मात्र १५ इच्छुक उमेदवार असल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये काही शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्यासह परजिल्हय़ातील काही इच्छुक उमेदवारांचे नाव चर्चिल्या जात आहे. याच मतदारसंघात काँग्रेसच ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ तर मनसेच्यावतीने ६ जण इच्छुक आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आविर्भावात कामास सुरुवात केली असून, मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केल्या आहेत. अद्याप कोणतीच तडजोड न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, कोणाला तिकीट मिळू शकते याचा अंदाज बांधणे सुरू झाले आहे.