वाशिम जिल्हय़ात ध्वजदिन निधी संकलनाचे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण
By Admin | Updated: December 6, 2014 01:20 IST2014-12-06T01:20:10+5:302014-12-06T01:20:10+5:30
ध्वजदिन निधीतून ६0 टक्के निधी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी खर्च तर ४0 टक्के निधी होतो सैनिकांच्या पाल्यांसाठी खर्च.

वाशिम जिल्हय़ात ध्वजदिन निधी संकलनाचे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण
वाशिम : ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ सन १९५६ पासून सुरु आहे. ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हय़ाला दिलेल्या उद्दिष्टांपैकी आजपर्यंत ९४.८0 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिन सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळाव्याचे कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली ५ डिसेंबर रोजी पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जवादे, महसूलचे उपजिल्हाधिकारी तुपेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल आर. आर. जाधव हे उपस्थित होते.
शहिदांच्या स्मृतीस्तंभास जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्याहस्ते दीप प्रज्वलीत करुन व नवोदय विद्यालयातील मुलींच्या चमूने स्वागत गीत गाऊन तसेच सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल आर.आर. जाधव यांनी केले. ध्वजदिन निधी संकलनाचा कार्यक्रम दरवर्षी ७ डिसेंबर रोजी असतो; परंतु सदर दिनांकास रविवार हा शासकीय सुट्टीचा दिवस येत असल्यामुळे शासनाच्या परिपत्रकानुसार हा कार्यक्रम ५ डिसेंबर रोजी घेण्यात आला असल्याचे जाधव यांनी सांगितले. ध्वजदिन निधी संकलनातून सैनिकांच्या पाल्यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय व इतर सुविधेसाठी वापरात आणला जातो; तसेच राज्य शासनाच्या शहिद जवानांच्या नातेवाइकांना १९९९ पासून ५ लक्ष रुपयांचा सैनिक कल्याण निधी म्हणून दिला जातो. ध्वजदिन निधीतून ६0 टक्के निधी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी व ४0 टक्के निधी सैनिकांच्या पाल्यांसाठी होस्टेल व इतर सुविधांकरिता वापरात आणला जातो.