बाप्पांच्या आगमनासाठी जिल्हावासी सज्ज
By Admin | Updated: August 27, 2014 00:17 IST2014-08-27T00:17:17+5:302014-08-27T00:17:17+5:30
उत्साहावर महागाईचे सावट : बाजारपेठा गेल्या गजबजून, मंडप उभारणी अंतिम टप्प्यात

बाप्पांच्या आगमनासाठी जिल्हावासी सज्ज
वाशिम : गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे आली असून, गणेशभक्तांचा आनंद द्विगुणीत होत आहे. मात्र, कोरड्या दुष्काळाचे सावट आणि गणरायाच्या आगमन मार्गावरील खड्डय़ांचे विघ्न आदी बाबी गणेशभक्तांच्या आनंदावर काही प्रमाणात विरजन पाडण्यास कारणीभूत ठरत आहेत. गणरायाच्या आगमनाची चाहूल सर्व गणेशभक्तांना लागली आहे. घरगुती गणरायासोबतच सार्वजनिक गणेश मंडळे विविध ठिकाणी बसविणार्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. वाशिम शहरासह जिल्ह्यात प्रत्येक शहरात गणरायाचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक पर्वणी असते. या उत्सवासाठी सर्व तयारीनिशी सज्ज झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. रस्ते दुरुस्ती, परवाने, होडिर्ंग्ज आणि कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांची व्यवस्था स्थानिक प्रशासन करीत असते. उत्सव साजरा करताना गणेशभक्त आणि मंडळांना कोणत्याही समस्या जाणवू नयेत, हा या सर्व तयारीचा उद्देश असतो. एकिकडे गणरायाच्या आगमनाचा उत्साह तर दुसरीकडे कोरड्या दुष्काळाचे सावट, महागाईची झळ आणि रस्त्यांवरील खड्डे अडचणीच्या बाबी ठरत आहेत. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा शहरातील गणेशभक्तांनी गणरायांच्या मुक्कामासाठी मंडप सजावटीची तयारी पूर्ण केली आहे. महागाईची झळ सोसून विविध प्रकारच्या मूर्तींची बुकिंग केली आहे. आता केवळ गणरायांच्या आगमनाची आस लागून आहे.