जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट चार वर्षांपासून नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:56+5:302021-01-13T05:45:56+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात दैनंदिन शेकडो रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येतात. त्यातील अनेक रुग्ण उपचारार्थ भरतीत राहतात. संबंधितांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच ...

जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट चार वर्षांपासून नाही
जिल्हा सामान्य रुग्णालयात दैनंदिन शेकडो रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येतात. त्यातील अनेक रुग्ण उपचारार्थ भरतीत राहतात. संबंधितांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच कधीकाळी अनुचित घटना घडल्यास त्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे, याकरिता शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वेळोवेळी फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र या महत्त्वाच्या बाबींकडे प्रशासकीय दुर्लक्ष होत आहे. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहणी केली असता, सर्वच ठिकाणची वायरिंग सुस्थितीत असल्याचे दिसून आले; मात्र गेल्या ४ वर्षांपासून ऑन रेकॉर्ड इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही. यामुळे रुग्णसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.
...................
बॉक्स :
रुग्णालयातील वायरिंग सुस्थितीत
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहणी केली असता, सर्वच ठिकाणची वायरिंग रीतसर पाइप टाकून सुस्थितीत असल्याचे दिसून आले. याशिवाय कुठेही इलेक्ट्रिकच्या बोर्डांची तोडफोड झालेली नाही. केवळ अधूनमधून व्होल्टेज कमीअधिक होण्याची समस्या असल्याचे दिसून आले.
.....................
‘ऑडिट’बाबत प्रशासनाचे दुर्लक्ष
शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट दर दोन वर्षांनी व्हायला हवे. रुग्णालय प्रशासनाची ही जबाबदारी होय; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले असून ४ वर्षांपासून ऑडिट झालेले नाही.
......................
जिल्हा शल्य चिकित्सक कोट
जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत उभी झाली, त्यावेळी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या संसाधनांना अनुसरून विद्युत पुरवठा मिळाला होता. सध्या ७० ते ८० वातानुकूलित यंत्र, ऑक्सिजन, एक्स-रे मशीन यासह इतरही संसाधनांची वाढ झाली आहे. त्यामुळे व्होल्टेजची समस्या जाणवत आहे. रुग्णालयात एक खासगी इलेक्ट्रिशियनची नेमणूक करण्यात आलेली आहे. ऑडिटही लवकरच करून घेतले जाईल.
- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
...............
कोट :
विद्युत सुरक्षेच्या बाबतीत रुग्ण निश्चिंत
जिल्हा सामान्य रुग्णालयात विद्युतविषयक कुठल्याच समस्या जाणवत नाहीत. पुरेसा विद्युत प्रकाश मिळण्यासह पंखेही दिवसभर सुरू असतात. त्यामुळे कुठलीच भीती वाटत नाही.
- मंगला गायकवाड, रुग्ण
..........................
शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने इलेक्ट्रिक ऑडिट करून घ्यायला हवे होते. यासंबंधी विशेष माहिती नाही; परंतु रुग्णालयात विद्युतविषयक कुठल्याही समस्या जाणवल्या नाहीत.
- रमेश शिंदे, रुग्ण