जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा!

By Admin | Updated: January 4, 2016 02:35 IST2016-01-04T02:35:16+5:302016-01-04T02:35:16+5:30

वाशिम जि.प. कृषी समितीचा शासनाकडे ठराव.

District declares drought! | जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा!

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा!

वाशिम: अंतिम पैसेवारी सरासरी ४४ पैसे जाहीर झालेली असतानाही वाशिम जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले नाही. या पृष्ठभूमीवर शासनाने जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे, दुष्काळ मदतनिधीचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्राधान्यक्रमाने लाभ द्यावा, अशा आशयाचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीने शनिवारी पारित करून शासनाकडे सादर केला जाणार आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने २९ डिसेंबरला ३0५0 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले; मात्र या पॅकेजचा जिल्ह्याला फारसा लाभ होणार नसल्याने शेतकर्‍यांना भरीव मदत निधीची गरज आहे. यावर्षी पाऊस फितुर झाल्याने शेतकर्‍यांचे बजेट कोलमडले. भावी संकटाच्या भीतीने काही शेतकरी मृत्यूला जवळ करीत आहेत, तर काही शेतकरी या संकटातून स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात आहेत. जिल्ह्याची सुधारित व अंतिम पैसेवारी ५0 च्या आत असतानाही, शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केलेला नाही. २९ डिसेंबरला केंद्र सरकारने महाराष्ट्राला ३0५0 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला; मात्र पहिल्या टप्प्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त होती. त्यामुळे या पॅकेजचा वाशिम जिल्ह्याला फारसा लाभ मिळणार नाही. शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केल्यास विशेष पॅकेज व अन्य सुविधांचा शेतकरी व शेतकरीपुत्रास लाभ होईल, यावर कृषी विषय समितीच्या सभेत चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुभाष शिंदे यांच्या दालनात २ जानेवारीला पार पडलेल्या या सभेला कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर, जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर, श्याम बढे, उषा अनिल जाधव, हरिदास कोरडे यांच्यासह समिती सदस्य, तालुका कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

Web Title: District declares drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.