मंगरुळपीर शहराला दुषित पाणी पुरवठा
By Admin | Updated: September 4, 2014 23:04 IST2014-09-04T23:04:08+5:302014-09-04T23:04:08+5:30
मंगरुळपीर शहराला दुषित पाणी पुरवठा; नगर परिषदचे दुर्लक्ष, जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव.

मंगरुळपीर शहराला दुषित पाणी पुरवठा
मंगरुळपीर: शहराला गत आठ दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत आहे. शहरात आधीच साथीचे आजार पसरले असताना या पाण्यामुळे जलजन्य आजार बळावण्याचीही भिती निर्माण झाली आहे.
मंगरुळपीर शहराला मोतसावंगा येथील धरणातून नगर परिषदेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. जवळपास ४0 हजार लोकसंख्या असलेल्या मंगरुळपीर शहरात बहुतांश कुटंबांकडे नगर परिषदेची नळ जोडणी आहे. अर्थात पिण्यासाठी शहरातील संपूर्ण नागरिक नळाच्या पाण्याचाच वापर करतात. नगर परिषदेला नळ जोडणीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात महसूल उपलब्ध होतो. या मोबदल्यात नागरिकांना पुरेशा प्रमाणात आणि शुद्ध पाणी पुरवठा करणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी नगर परिषदेने जलशुद्धीकरण प्रक्रियाही अनेक वर्षांंंपासून सुरू केली आहे; परंतु गत आठ दिवसांपासून शहराला दुषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे ही प्रक्रि या बंद असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत शहरवासियांना मिळणारे पाणी गढूळ आणि पिण्यायोग्य नाही; परंतु नागरिकांकडे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव हेच पाणी प्यावे लागत आहे. हे दुषित पाणी पिण्यामुळे डायरिया, काविळ, मूतखडा आदिंसारख्या गंभीर जलजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. असे असतानाही या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे यापूर्वीही अनेकदा नागरिकांना दुषित पाणी पुरवठा झालेला असून, १६ वर्षांंंपूर्वी दुषित पाणी पुरवठय़ामुळे शहरात जलजन्य आजारांनी थैमान घातले होते. त्यातच ग्रामीण रुग्णालयात औषधी उपलब्ध नसल्यामुळे दोघांना जीवही गमवावा लागल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. शहरातील नागरिकांसह विविध कामानिमित्त ग्रामीण भागातून येणार्या व्यक्तींनाही उपाहागृहांसारख्या ठिकाणी हेच पाणी प्यावे लागत असल्यामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
नगर परिषदेद्वारे शहरातील १७ वार्डमधून नळाच्या पाण्याचे नमुने संकलित करून तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. अनेकदा पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून देण्यात येतो. तयानुसार पाणीशुद्धतेसाठी संबंधित अधिकार्यांना सूचनाही देण्यात येतात; परंतु त्याचा फारसा फायदा होत नाही.