महायुतीच्या मनोमिलनाची विण ढिलीच!
By Admin | Updated: October 8, 2014 00:36 IST2014-10-08T00:36:12+5:302014-10-08T00:36:12+5:30
वाशिम जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा वेध.

महायुतीच्या मनोमिलनाची विण ढिलीच!
वाशिम : शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाने चाणक्यनितीचा अवलंब करून स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं व शिवसंग्राम या पक्षांची मोट बांधत महायुती जन्माला घातली. मतांचा जोगवा मागण्यासाठी होणार्या सभांमध्येही महायुतीचे वरिष्ठ नेते गळ्यात गळे घालून वावरताना दिसतात. मात्र, स्थानिक पातळीवर अद्यापही महायुतीमधील मित्र पक्षांच्या मनोमिलनाची वीण अद्याप ढिलीच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील रिसोड व कारंजा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराने ही बाब अधोरेखित केली आहे.
राज्यात सन १९९0 मध्ये शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीची मुहुर्तमेढ रोवली गेली होती. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत प्रमोद महाजन व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा युतीच्या गठणात सिंहाचा वाटा होता. यंदा मात्र, दोन्ही पक्षातील नेत्यांच्या सत्तेच्या हव्यासापोटी २५ वर्षापासून अस्तीत्वात असलेल्या युतीचा घटस्फोट झाला आहे. परिणामी, दोन्ही पक्षांनी आपल्या पैलवानांना स्वबळाचे तेल लावून विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती तुटली असली तरी भाजपने चाणक्यनितीचा अवलंब करीत महायुतीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं व शिवसंग्राम या छोट्या पक्षांना आपल्या दावणीला बांधून ठेवण्यात यश मिळविले. वेगवेगळ्या समाज घटकांशी ऋणाणुबंध जपणारे हे मित्र पक्ष जोडून भाजपने राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग अवलंबिला आहे. ह्यशिवछत्रपतींचा आशिर्वाद, चला देऊ मोदींना साथह्ण म्हणत महायुतीचे राज्यातील सर्व शिलेदार गळ्यात गळे घालत मतदारांना मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर या नेत्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत सभा होत आहेत. सभेच्या ठिकाणानुसार त्या- त्या घटक पक्षांचे नेते नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावरही उपस्थिती लावत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर प्रचार करताना ज्या पक्षाला तिकीट दिले, त्या पक्षाचे कार्यकर्ते आघाडीवर व घटक पक्ष बॅकफुटवर असे चित्र प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे.रिसोड व कारंजा मतदारसंघात ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. जागा वाटपाच्या गुर्हाळानंतर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामसाठी रिसोड मतदारसंघ सोडण्यात आल्याची चर्चा शिवसंग्रामसह भाजपच्याही गोटात होती. एवढेच नव्हेतर शिवसंग्रामने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप जाधव यांना आपल्या गोटात खेचून वातावरण निर्मितीही सुरू केली होती. जाधव यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. तसेच विष्णुपंत भुतेकर हेही शिवसंग्रामकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. निवडणूक अर्ज भरण्याच्यादिवशीसुध्दा ते सोबत होते. मात्र अचानक हा मतदारसंघ शिवसंग्रामऐवजी भारतीय जनता पक्षासाठी सोडण्यात आला. भाजपने माजी आमदार विजय जाधव यांना येथून रिंगणात उतरिवले. त्यामुळे स्वाभाविकच शिवसंग्रामच्या इच्छुकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे फर्मान आले.