अविश्वास प्रस्तावावर १८ एप्रिलला होणार चर्चा !
By Admin | Updated: April 16, 2017 13:35 IST2017-04-16T13:35:53+5:302017-04-16T13:35:53+5:30
अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी १८ एप्रिलला विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.

अविश्वास प्रस्तावावर १८ एप्रिलला होणार चर्चा !
रिसोड : रिसोड पंचायत समितीचे विद्यमान सभापती व उपसभापतीविरूद्ध सत्ताधारी भाजपासह सेनेच्या सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी १८ एप्रिलला विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.
जून २०१६ मध्ये पार पडलेल्या रिसोड पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने राजकीय खेळी खेळत दोन्ही पदे काबीज केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या प्रत्येकी एका सदस्याला भाजपामध्ये घेत विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळविले होते. दरम्यान, दहा महिन्याच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने समिकरणे बदलली आणि सत्ताधारी भाजपाच्या सहा सदस्यांसह सेनेच्या सहा सदस्यांनी सभापती-उपसभापती विरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. ११ एप्रिल रोजी दाखल केलेल्या या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी १८ एप्रिल रोजी रिसोड पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. यावेळी अविश्वास प्रस्तावावर चर्चा होऊन मतदान घेण्यात येणार आहे. अविश्वास प्रस्ताव पारित होतो की बारगळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.