सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा
By Admin | Updated: November 14, 2014 01:28 IST2014-11-14T01:28:30+5:302014-11-14T01:28:30+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या सभेत महिला सदस्यांनी लावून धरला शिक्षण व आरोग्याचा प्रश्न.

सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा
वाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेच्या १३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, महिला व बालकल्याण सभापती ज्योति गणेशपुरे, कृषी व पशु संवर्धन सभापती हेमेन्द्र ठाकरे, समाजकल्याण सभापती पानुबाई जाधव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डी. ए. वानखेडे यांची मंचावर उपस्थिती होती. सभेत महिला सदस्य आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांवर आक्रमक झाल्याचे दिसून आल्या.
तेराव्या वित्त आयोगाच्या ८८ लक्ष २८ हजार निधीचे वितरण सर्व जि. प. सर्कलमध्ये समान प्रमाणात करावे, असा ठराव नत्थुजी कापसे यांनी मांडला. त्यास विकास गवळी यांनी अनुमोदन दिले, तसेच हा निधी रस्ते, पूल बांधकाम, किरकोळ दुरुस्ती यावर खर्च करावे, असेही ठरविण्यात आले.
पशु प्रदर्शन, कृषी चर्चासत्र, बौलबंडी वाटप यासह समाजकल्याण व महिला बालकल्याणच्या विविध अनुदानाच्या मुद्यांवर अनेक सदस्यांनी आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले. जि. प. सदस्य चंदु जाधव यांनी मालेगाव पंचायत समिती अंतर्गत कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा शेवटपयर्ंत लावुन धरला. याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन साप्रविचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी दिले. जि. प. शाळेच्या समस्यांवर महिला सदस्यांनी सभागृहात आपला रोष व्यक्त केला. मीनाताई भोने यांनी सुरुवातीला हा प्रश्न लावून धरला. नंतर उषा जाधव यांनीही आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. अनेक ठिकाणी शाळेची शिक्षकांअभावी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. आरोग्य आणि शिक्षणाबाबत निर्णय प्रक्रियात आम्हालाही विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाधिकारी अनुपस्थित असल्यामुळे जयवंशी यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले. बिंदुनामावली मंजूर झाल्यानंतर याबाबत पदभरती करता येईल; तसेच अतिरिक्त शिक्षकांची मागणी शासनाकडे करण्यात येईल, असे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंशी यांनी सांगितले.