पाणी पुरवठ्याच्या व्हॉल्व्हमध्ये घाण पाणी
By Admin | Updated: February 28, 2017 16:06 IST2017-02-28T16:06:54+5:302017-02-28T16:06:54+5:30
येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणा-या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह उघडा आणि नालीच्या बाजूलाच असल्याने त्यामध्ये नालीचे घाणपाणी

पाणी पुरवठ्याच्या व्हॉल्व्हमध्ये घाण पाणी
>ऑनलाइन लोकमत
शिरपूर, दि. 28 - येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणा-या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह उघडा आणि नालीच्या बाजूलाच असल्याने त्यामध्ये नालीचे घाणपाणी शिरत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मालेगाव तालुक्यामधील शिरपूर येथे ग्रामस्थांसाठी जवळपास १० वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेजयल योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गावाला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. शिरपूर हे मोठे गाव असल्याने गावभरातील लोकांना योग्य आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने नळ सोडण्यात येतात. यासाठी योजनेच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. यातील एक व्हॉल्व्ह शिरपूर पोलीस स्टेशनच्या समोरील भागात आहे. हा व्हॉल्व्ह खोलगट जागेवर असून, त्याच्या बाजूलाच सांडपाण्याची नाली आहे. या नालीतील घाणपाणी त्यामध्ये शिरून ते नळातील पाण्यासह ग्रामस्थांच्या घराघरात पोहोचते. याच पाण्याचा वापर लोक पिण्यासाठी करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठा धोका आहे.
दरम्यान, हा प्रकार मागील वर्षभराहून अधिक काळापासून सुरू असतानाही ग्रामपंचायतने त्याची दखल घेतली नाही. आता मंगळवार २८ फेब्रुवारी रोजीच शिरपूरच्या नव्या सरपंच म्हणून सुनिता अंभोरे यांची निवड झाली असून, ते आता याकडे लक्ष देऊन घाणपाण्याच विल्हेवाट लावत वॉल दुरुस्त करतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.