वर्षभरात डिझेल ३० टक्के, किराणा ४० टक्क्यांनी महागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST2021-05-17T04:38:56+5:302021-05-17T04:38:56+5:30
वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ठाण मांडून आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून अधूनमधून लाॅकडाऊन, संचारबंदी, ...

वर्षभरात डिझेल ३० टक्के, किराणा ४० टक्क्यांनी महागला !
वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ठाण मांडून आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून अधूनमधून लाॅकडाऊन, संचारबंदी, कडक निर्बंध लावण्यात येऊन संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले जात आहेत. यामुळे परिस्थिती गंभीर झाली असून, सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मजूर, कामगारांच्या हाताला काम मिळणे कठीण झाल्याने स्वत:सोबतच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न संबंधितांना भेडसावत आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटकाही बसत आहे. डिझेलच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम माल वाहतूक दरवाढीवर झालेला आहे. परिणामी, किराणा साहित्याचे दरही वधारले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून किराणा वस्तूंच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यातच कडक निर्बंधांच्या काळात नफेखोरीच्या प्रकारालाही उधाण आले असून, सर्वसामान्य ग्राहक पुरता हैराण झाला आहे.
...............
काय म्हणतात गृहिणी...
कोरोना संसर्गाच्या संकटाने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढले असतानाच खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. किराणा मालाच्या सर्वच वस्तूंचे दर वाढत असल्याने मासिक बजेट कोलमडले आहे.
- आरती अतुल ताठे, कारंजा
...............
कोरोना संसर्गाच्या संकटामुळे व्यवसाय पूर्णत: बंद ठेवावा लागत आहे. यामुळे घरातील कर्ते पुरूष हैराण झाले आहेत. आवकच बंद झाल्याने पैशांची चणचण भासत आहे. अशा स्थितीत किराणा वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने जगणे मुश्कील झाले आहे.
- अनिता गायकवाड, वाशिम
....................
डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे कारण समोर करून वाहतूकदारांनी त्यांचे दर वाढविले आहेत. यामुळे किराणा वस्तूंच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या दर वाढलेले आहेत.
- आशुतोष शिंदे, किराणा व्यापारी
................
किराणा दर मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
तूरडाळ ८० ९२ ११०
हरभरा डाळ ५२ ६२ ६५
साखर ३५ ३५ ३६
तांदूळ (कोलम) ४० ४५ ४८
गूळ ३३ ३४ ३८
बेसन ५६ ६७ ८०
........................
तेलाचे दरही दुपटीने वाढले (दर प्रतिकिलो)
सूर्यफूल १२० १६७ १७०
करडई १८२ १९४ १७२
सोयाबीन १०५ ११५ १५५
पामतेल १०० ११० १४०
शेंगदाणा १४५ १७२ १८०
.................
डिझेल दराचा भाव प्रतिलीटर
जानेवारी २०२० - ७०.२१
जून २०२० - ७२.२३
जानेवारी २०२१ - ८१.३७
मे २०२१ -८८.७५
.................
कोट :
वाशिम जिल्ह्यात विविध स्वरूपातील किराणा माल इतर जिल्ह्यातून आयात केला जातो. डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनमालकांनी वाहतुकीच्या दरातही वाढ केलेली आहे. त्यामुळे किराणा मालाच्या दरात वाढ झालेली आहे.
- आनंद चरखा
अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम