नऊ दिवसात पाच हजार कुटुंबीयांशी ‘संवाद’!
By Admin | Updated: August 31, 2016 02:19 IST2016-08-31T02:19:54+5:302016-08-31T02:19:54+5:30
‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ उपक्रम; अधिकारी-पदाधिकारी ग्रामस्थांच्या दारी.

नऊ दिवसात पाच हजार कुटुंबीयांशी ‘संवाद’!
वाशिम, दि. ३0 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'भेटी-गाठी स्वच्छतेसाठी' या उपक्रमाच्या नवव्या दिवसांपर्यंत वाशिम जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या तब्बल पाच हजार कुटुंबीयांशी अधिकारी व पदाधिकार्यांनी संवाद साधला.
राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या ३५ हजार कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्त्व पटवून देण्याचे उद्दिष्ट वाशिम जिल्हा परिषदेने निश्चित केले. २२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. २२ ते ३0 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील तब्बल पाच हजार कुटुंबीयांशी संवाद साधून शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अधिकारी व पदाधिकार्यांनी गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या कुटुंबीयांकडे शौचालय बांधकामाचा आग्रह धरला. सोनखास, बिटोडा भोयर, जांभरून परांडे आदी गावातील नागरिकांनी गाव हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प केला असून, पदाधिकारी व अधिकार्यांनी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
वाशिम जिल्ह्यात ३५ हजार कुटुंबाच्या भेटीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, स्वच्छता कक्षाचे कर्मचारी, ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेचे पदाधिकारी जोमाने कामाला लागले असल्याचे दिसून येते.
यावर्षी जिल्ह्यात ३५ हजार ८६५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शौचालय बांधकाम मोहिमेत दिरंगाई करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकार के.एम. अहमद यांनी दिले आहेत. शौचालय बांधकाम झाल्यानंतर तातडीने १२ हजार रुपयांचे अनुदान संबंधित लाभार्थींस वितरित करण्याचे निर्देशही दिले आहेत.