सकाळी धामधूम, दुपारी सामसूम, रात्रीला टामटूम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST2021-04-25T04:40:13+5:302021-04-25T04:40:13+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने २२ एप्रिलपासून संचारबंदीची सुधारित नियमावली लागू केली असून, सकाळी ७ ...

सकाळी धामधूम, दुपारी सामसूम, रात्रीला टामटूम !
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने २२ एप्रिलपासून संचारबंदीची सुधारित नियमावली लागू केली असून, सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची एकच धामधूम सुरू असते. सकाळी ११.३० वाजतानंतर मात्र शहरासह जिल्ह्यातील रस्ते सामसूम राहत असून, रात्री ८ ते १० च्या दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक शहरापासून हाकेच्या अंतरावरील ढाबे, हॉटेलसमोर नागरिकांची काही प्रमाणात ‘टामटूम’ दिसून येते.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदीची सुधारित नियमावली लागू केली असून, त्याची अंमलबजावणीदेखील जिल्ह्यात सुरू झालेली आहे. अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने व दवाखाने वगळता उर्वरित सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आहे; तर बँक सेवेला सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मुभा आहे. वाशिम शहरातील जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांत सकाळी ९ ते ११ या वेळेत भाजीपाला, किराणा व अन्य वस्तू, साहित्य घेण्यासाठी नागरिकांची एकच धामधूम सुरू राहत असल्याचे गत तीन दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. सर्वाधिक गर्दी ही बँकांसमोर होत असून, येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणत्याही प्रकारे पालन होत नसल्याने गुरुवारी (दि. २२), शुक्रवारी (दि. २३) दिसून आले. या गर्दीवरून कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तुटणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सकाळी ११.३० वाजतानंतर मात्र वाशिम शहरासह सर्वच शहरांतील रस्त्यांवर सामसुम राहत असल्याचे दिसून येते. रात्री ८ ते १० या वेळेत शहराबाहेरील महामार्गालगतची काही हॉटेल व ढाबे येथे ‘मागील दारातून’ तळिरामांची काही प्रमाणात लगबग राहत असल्याचे दिसून येते.
०००
बॉक्स
बँकांसमोरील गर्दी नियंत्रणात आणणे गरजेचे
सकाळी ८ ते ११ या वेळेत मार्केट, भाजीबाजार येथे नागरिकांची गर्दी होत आहे; मात्र सर्वाधिक गर्दी बँकांसमोर होत असून, येथे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचे पालन होत नसल्याचे दिसून येते. या गर्दीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक ठरत आहे. एका रांगेत विशिष्ट अंतर राखून उभे करणे, ऑनलाईन सुविधा किंवा अन्य प्रभावी माध्यमँद्वारे गर्दी नियंत्रणात कशी येईल, या दृष्टिकोनातून अंमलबजावणी झाली तर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल.