लाचखोर जात पडताळणी उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात!
By Admin | Updated: April 4, 2017 00:20 IST2017-04-04T00:20:29+5:302017-04-04T00:20:29+5:30
२० हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या जात पडताळणी उपायुक्तासह कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात अटक केली आहे.

लाचखोर जात पडताळणी उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात!
वाशिम : जात पडताळणी विभागात कंत्राटी तत्त्वावर आॅपरेटर म्हणून नियुक्ती देण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या जात पडताळणी उपायुक्तासह कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात अटक केली. या प्रकरणात तक्रारदाराने एसीबीकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये जातपडताळणी विभागात कार्यरत कर्मचारी वैभव राठोड याच्या माध्यमातून उपायुक्त शरद चव्हाण यांच्याशी भेट घेऊन कंत्राटी पदावर भरती करण्याची विनंती केली. त्यानंतर तक्रारदार युवकांची टायपिंगची टेस्ट घेऊन, १७ मार्च २०१७ पासून तक्रारदाराला कामावर रुजू करून घेतले; मात्र यापोटी त्याच्याकडून ३० हजार रुपयांची मागणी केली. प्रथम वैभव राठोडने उपायुक्त शरद चव्हाणच्या नावे ३० हजार रुपये मागितले आणि नंतर चव्हाणने स्वत: २० हजार रुपये लाचेची मागणी केली. उर्वरित १० हजार रुपये नंतर देण्याचे ठरले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ एप्रिल रोजी सापळा रचला असता, उपायुक्त चव्हाण याने तक्रारदाराकडून २० हजार रुपये लाच स्वीकाराताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली.
या प्रकरणात सहभागी असलेला कंत्राटी कर्मचारी वैभव राठोडवरही लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.