प्रस्थापितांच्या नशिबी दारुण पराभव !
By Admin | Updated: October 20, 2014 01:06 IST2014-10-20T01:04:17+5:302014-10-20T01:06:40+5:30
वाशिम जिल्हात मतांचे धृव्रीकरण, प्रमुख पक्षांमधील बंडखोरीमुळे निकाल धक्कादायक.

प्रस्थापितांच्या नशिबी दारुण पराभव !
वाशिम : शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीचा घटस्फोट, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीतील बिघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप-बहुजन महासंघाने केलेले मतांचे धृव्रीकरण तथा प्रमुख पक्षांमधील बंडखोरीमुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागले. या निकालाने जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांना अस्मान दाखविले असून, त्यांचे राजकीय साम्राज्य खालसा झाले आहे. जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातून यावेळी माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विद्यमान आमदार प्रकाश डहाके, माजी आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ज्योती गणेशपुरे यांनी नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राजेंद्र पाटणी यांना यश आले असून, उर्वरित प्रस्थापिताना मात्र पराभव पचवावा लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा फटका या पक्षाला बसल्याचे दिसून येत आहे. वाशिम मतदारसंघातून माजी आमदार सुरेश इंगळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. सन २00४ च्या निवडणुकीत इंगळेंनी भाजपच्या गडाला सुरूंग लावत कॉग्रेसला विजयाच्या गावापर्यंंत पोहोचविले होते. यावेळी मात्र त्यांना मतदारांनी सपशेल नाकारले. रिसोड मतदारसंघात भाजपचे माजी आमदार विजय जाधव यांचाही दारूण पराभव झाला आहे. जाधव यांनी तब्बल १0 वर्ष तत्कालीन मेडशी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते.