रेल्वे स्थानकांवर सुविधांचा बोजवारा
By Admin | Updated: September 22, 2014 01:43 IST2014-09-22T01:37:31+5:302014-09-22T01:43:25+5:30
वाशिम जिल्ह्यातील अवस्था : स्वच्छता मोहिमेच्या पृष्ठभूमिवर लोकमतने घेतला आढावा.
रेल्वे स्थानकांवर सुविधांचा बोजवारा
वाशिम : पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणार्या वाशिम रेल्वे स्थानकासह, अमानवाडी, जउळका रेल्वे, काटा, केकतउमरा आदी वाशिम जिल्ह्यातील रेल्वे स्थानके विविध समस्यांचे स्टेशन झाले आहे. परिणामी, प्रवाशी पार वैतागुन गेले आहेत. रेल्वे प्रशासन मात्र अद्यापही सुस्तच दिसून येत आहे.रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी येत्या २ ऑक्टोंबरपर्यंत देशातील सर्व रेल्वे स्थानके स्वच्छ व सुविधायुक्त करण्याचे फर्माण सोडले आहे. या पृष्ठभूमिवर वाशिम जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचा लोकमतच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला असता सदरचे विदारक वास्तव समोर आले.
गत वर्षी वाशिम रेल्वे स्थानकाने रेल्वे विभागाला सुमारे ३२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले होते. मात्र, त्यानंतरही रेल्वे विभागाने येथे कुठल्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. येथे गुड्स ट्रान्सपोर्ट साठी शेड उभारलेले नाही. परिणामी व्यापार्यांचा लाखमोलाचा माल बेवारस पडून असतो. गुड्स प्लॅटफार्मच्या दोन्ही बाजूंना गेट व तार फेन्सिंग केलेले नाही. या शिवाय येथे अस्वच्छतेने कळस गाठला आहे.
स्थानकावर चालु बुकींग व आरक्षणाची स्वतंत्र व्यवस्था नाही. तीन अथवा चार चाकी गाड्यांना स्टेशनबाहेर रोखण्यासाठी बॅरिकेट्स उभारण्यात आलेले नाहीत. कुलींची नियुक्ती केलेली नाही. पावसाळ्याच्या दिवसात फलांटावर पाणी साचत असल्याचेही सर्वश्रुत आहे. सदर समस्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत रेल्वे विकास समितीने नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे पाठपुरावा केलेला आहे. तथापि, त्याची अद्यापपावेतो दखल घेतल्या गेली नाही. रेल्वे मंत्र्याच्या आदेशाने तरी २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता व्हावी.
टचस्क्रिन मशिनमधील बिघाड पाचविलाच
रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक व आरक्षणाची परिस्थिती सहज समजावी या हेतूने रेल्वे विभागाने प्रत्येक रेल्वे स्थानकावर टचस्क्रिन मशीन उपलब्ध करून दिले. काही महिन्यांपूर्वी स्थानकावर उभी असलेली मशिन प्रवाशांना सुविधा पुरवित होती. तथापि काही महिन्यांपासून या मशिनचा कि पॅडमध्ये बिघाड आला आहे. परिणामी सदर मशिन केवळ शोभेची वस्तु बनली असुन याचा फायदा होताना दिसत नाही. सदर मशिनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडाकडे रेल्वे प्रवाश्यांनी अनेकवेळा रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.
तिकीट खिडकी वाढविणे गरजेचे
येथे सद्यस्थितीत एकच तिकीट खिडकी आहे. सदर मार्गावरून धावणार्या रेल्वेंची व प्रवाशांची संख्या पाहता ही खिडकी अपुरी पडत आहे. अकोल्याला नोकरीवर असणारे वाशिमचे रहिवाशी रेल्वेनेच येणे-जाणे करतात. शिवाय दररोज अकोला किंवा हिंगोली कडे जाणार्या प्रवाशांची संख्याही भरपूर आहे. त्यामुळे येथे आणखी एक तिकीट वाढविणे गरजेचे झाले आहे.
मुत्रीघरात पसरले घाणीचे साम्राज्य
रेल्वे स्थानकाच्या मुत्रीघरात स्वच्छतेचा अभाव आहे. नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे दुर्गधीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.पुरूष प्रवाशी चक्क मुत्रीघरांऐवजी उघड्यावर लघुशंका करतात. परिणामी महिला प्रवाश्याची कुचंबना होते. फलाटाच्या स्वच्छतेची परिस्थिती बिकट आहे. स्वच्छता होत नसल्यामुळे तेथे कचर्याचे ढिग पडलेले असतात.