माती विरहीत चारा निर्मिती प्रात्यक्षिक
By Admin | Updated: February 14, 2015 02:01 IST2015-02-14T02:01:53+5:302015-02-14T02:01:53+5:30
शेतक-यांना मार्गदर्शन; कामरगाव, झोडगा पशुवैद्यकीय दवाखान्याचा कार्यक्रम.

माती विरहीत चारा निर्मिती प्रात्यक्षिक
कारंजालाड (जि. वाशिम) : कमी पर्जन्यमानामुळे जमिनीची धुप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पशुधनासाठी आवश्यक हिरव्या चार्याची भीषण टंचाई जाणवत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना झोडगा व कामरगावच्यावतीने परिसरातील शेतकर्यांना माती विरहीत हिरव्या चार्याची निर्मिती करणारे प्रात्यक्षिक ११ फेब्रुवारी रोजी दाखविण्यात आले. सद्यस्थितीत जिल्हाभरात जनावरांच्या चार्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक पशुपालक शेतकरी कवडीमोल भावाने आपली जनावरे विकत आहेत. चाराटंचाईवर थोड्याफार प्रमाणात मात करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना झोडगा व कामरगावच्यावतीने मातीविरहित हिरव्या चार्याची निर्मिती कशी करावी.त्याचे प्रात्यक्षिक ११ फेब्रुवारीला दाखविण्यात आले. कामरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्श्नही करण्यात आले. हिरव्या चार्याच्या टंचाईमुळे जनावरांत अनेक जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊन त्याचा परिणाम जनावरांच्या पैदासीवर होतो. जनावरांत वंध्यत्वाचे आजार बळावत आहेत. या आजारांवर औषधोपचा करताना वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. त्याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करून उपाय सुचविण्यात आले. त्यानंतर जनावरांचा पोषक असलेला हिरवा चारा कमीतकमी पाण्यावर, कमीतकमी जागेत, माती आणि कुठल्याही खतांचा किंवा औषधीशिवाय हायड्रोपोनिक पद्धतीने कसा निर्माण करायचा. त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या पद्धतीचा वापर करून कमीतकमी पाण्यात ७ दिवसांत एक किलो बायोगॅसपासून १0 ते १२ किलो हिरवा चारा तयार करणे शक्य असल्याचे दाखविण्यात आले.