सोनल प्रकल्पातील गाळ काढण्याची मागणी
By Admin | Updated: April 20, 2016 02:06 IST2016-04-20T02:06:49+5:302016-04-20T02:06:49+5:30
पावसाळ्यापूर्वी प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा!

सोनल प्रकल्पातील गाळ काढण्याची मागणी
मंगरुळपीर (जि. वाशिम): मालेगाव तालुक्यात येत असलेल्या व मंगरूळपीर तालुक्यातील शेतकर्यांना लाभदायक ठरणार्या सोनल मध्यम प्रकल्पात यंदा प्रथमच कमी जलसाठा असून, या प्रकल्पातील गाळाचा उपसा केल्यास भविष्यात सिंचनाची समस्या निकाली निघणार आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष पुरविण्याची मागणी शे तकर्यांमधून होत आहे. १९८३ साली प्रकल्प पूर्ण होऊन मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्यांचे हिरवे स्वप्न पूर्ण केले. या प्रकल्पामुळे कोरडवाहू शेती करणार्या शे तकर्यांना मोठा आर्थिक आधार या प्रकल्पामुळे मिळाला. शिवाय मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर आसपासच्या विहिरी तसेच बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाल्याने सिंचनात मोठय़ा प्रमाणात वाढ दिसून आली; मात्र मागील तीन वर्षांपासून अत्यल्प प्रमाणात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे शेतकर्यांना रब्बीची पिके घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. प्रकल्पाला जवळपास ३३ वर्षे पूर्ण झाली; परंतु अद्याप एकदादेखील प्रकल्पातील गाळ उपसा झाला नाही. परिणामी, प्रकल्पात पाण्याचा साठा कमी प्रमाणात होत आहे. शे तकर्यांच्या रब्बी पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने सोनलच्या पाण्यावर होणारे सिंचन घटत चालले आहे. याच प्रकल्पावर मालेगाव तालुक्यातील ४ व मंगरुळपीर तालुक्यातील ४ अशा ८ गावांना पाणी पुरवठा करणार्या जीवन प्राधिकरणाच्या दोन योजना कार्यान्वित आहेत. यावर्षी प्रकल्पातील जलसाठा घटल्यामुळे योजनेच्या प्रकल्पातील हेडवर्कच्या विहिरीत दोन मोटरपंपाद्वारे पाणी भरण्याचा प्रसंग ओढवला. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन प्रकल्पातील गाळ उपसा करावा, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.