जिल्ह्यात ९३ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

By Admin | Updated: April 12, 2017 01:30 IST2017-04-12T01:30:31+5:302017-04-12T01:30:31+5:30

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज : चार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन, यंदाही सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच

Demand for 93 thousand quintals of seeds in the district | जिल्ह्यात ९३ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

जिल्ह्यात ९३ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मागणीच्या आधारे कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. यंदा ४ लाख १३ हजार १५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. प्रस्तावित क्षेत्राच्या अंदाजानुसार कृषी विभागाने ९२ हजार ९६३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली असून, बियाणेदेखील उपलब्ध झाले आहे.
आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, गरजा आणि जिल्ह्याची भौगोलिक स्थिती डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले आहे. यंदाच्या हंगामात एकूण ४ लाख १३ हजार १५० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना यंदा खते, बियाणे, कीटकनाशके आणि कृषी साहित्यासह इतर आवश्यक साधनांचा तुटवडा पडू नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून, जिल्ह्यातील होलसेल विक्री केंद्रांसह इतर कृषी केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत, तसेच कृषी केंद्रांनी बियाणे, खते, कीटकनाशके यांची साठेबाजी करून काळाबाजार करू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यात कृषी विभागामार्फत विशेष पथक स्थापन करण्याची सूचना आमदार राजेंद्र पाटणी यांनी केली होती.
त्यांच्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिले, तसेच प्रत्येक कृषी केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी भरारी पथके नेमून त्यांच्याद्वारे गुणनियंत्रकाचे काम करण्यात येत आहे.
यंदाही जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करावी, यासाठी प्रचार करण्यासह अधिकाधिक शेतकऱ्यांना उपलब्धता आणि दर्जा पाहून घरचे सोयाबीन पेरण्याबाबत सल्ला देण्याच्या सूचना सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात तुरीचे सरासरी क्षेत्र ५२ हजार ७८० आहे; परंतु यंदा या पिकाची पेरणी ६० हजार हेक्टरवर प्रस्तावित आहे. त्यातही वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यंदाच्या हंगामासाठी पिकांची उत्पादकता नियोजनही पूर्वीपेक्षा खूप अधिक निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीनचे उत्पादकता नियोजन प्रति हेक्टर १५०९ किलो, तुरीचे प्रति हेक्टर ६२२, कपाशीचे ३२९, मुगाचे ६३३, तर उडिदाचे प्रति हेक्टर ७१४ किलो निश्चित करण्यात आले आहे.

खरीप हंगामासाठी बियाण्यांचे नियोजन
जिल्ह्यात २ लाख ८० हजार ४०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी अपेक्षित असताना कृषी विभागाने ८४ हजार १२० क्विंटल बियाण्यांची मागणी केली. तुरीचे क्षेत्र ६० हजार हेक्टर प्रस्तावित असताना ४ हजार ५० क्विंटल, बिटी कपाशीचे १८ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्रासाठी ४५० क्विंटल, मुगाचे क्षेत्र २५ हजार हेक्टर असताना १९५० क्विंटल, उडिदाचे क्षेत्र २४ हजार हेक्टर असताना, १८७२ हजार क्विंटल, संकरित ज्वारी ४ हजार हेक्टर असताना ३०० क्विंटल, सुधारित ज्वारीचे क्षेत्र ३५० हेक्टर असताना ३५ क्विंटल, सं. बाजरीचे क्षेत्र १०० हेक्टर असताना ३ क्विंटल, मक्याचे क्षेत्र १ हजार हेक्टर असताना १७६ क्विंटल, तिळाचे क्षेत्र ३०० हेक्टर असताना ७ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यंदा ४ लाख १३ हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ९२ हजार ९६३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली असून, बियाणे उपलब्ध झाले आहे. खरिपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. येत्या १३ एप्रिल रोजी खरीप आढावा बैठकीत आणखी काही मुद्यांवर चर्चा होईल. वाशिम जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन केले आहे. कोरडवाहू शेतीचे प्रमाण आणि प्रामुख्याने शेती व्यवसाय अधिक असल्याने खरिपात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, या विचाराने नियोजन केले आहे.
- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम .

Web Title: Demand for 93 thousand quintals of seeds in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.