युती तुटल्याने कारंजात सेनेचे नुकसान
By Admin | Updated: October 20, 2014 01:06 IST2014-10-20T01:03:42+5:302014-10-20T01:06:12+5:30
काँग्रेसची एक जागा कायम

युती तुटल्याने कारंजात सेनेचे नुकसान
वाशिम : विधानसभा निवडणुकीत आघाडी व युती तुटली. कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला त्याचा फटका बसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी प्रबळ उमेदवार न मिळाल्याने त्याचाही फटका जाणवल्याचे चित्र निवडणूक निकालावरून दिसून येते. युती व आघाडी असताना वाशिम विधानसभा मतदारसंघ काँग्रेस व भाजपाकडे होता. रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये युती व आघाडी असताना काँग्रेस व भाजप उमेदवार देत होते. कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये युती व आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना लढतीत होते. युतीची व आघाडीची फारकती झाल्याने प्रत्येकाने आपआपले उमेदवार यावेळी उभे केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती व आघाडी तुटल्याने प्रत्येक पक्षासमोर प्रबळ उमेदवार नसल्याने अनेक ठिकाणी कोणताही उमेदवार उभा करण्यात आला. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील मतदारांनी भाजपला सर्वाधिक मतदान केल्याचे दिसून येते. तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांना १ लाख ४७ हजार १७८ मतदारांनी मतदान केले. शिवसेनेच्या उमेदवारांना ६८५0५ मतदारांनी मतदान केले. काँग्रेस उमेदवारांना १ लाख ९ हजार ९१७, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना ४८ हजार ५६७ मतदारांनी मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. सेना व भाजपा युती असती, तर युतीमध्ये कारंजाकडे असलेली जागा शिवसेनेच्या ताब्यात असती. कारंजा येथे शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांना पडलेल्या मताची बेरीज केली, तर ५१ हजार २८ मते युतीच्या उमेदवारास पडली असती. युतीचा उमेदवार ठरल्याप्रमाणे शिवसेनेचा असता. युती तुटल्यामुळे शिवसेना व भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा केला. या घडामोडीमुळे शिवसेनेचे एका जागेचे नुकसान झाले. युती असती, तर रिसोडमध्ये युतीच्या उमेदवारास ७२६५६ आणि आघाडी असती तर ७६७५0 मतदान झाले असते, हे या निवडणुकीत झालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. झालेही तसेच. येथे काँग्रेसची जागा निवडून आल्याने येथे आघाडी तुटल्याचा काही परिणाम झाला नाही. वाशिममध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा विचार केला, तर येथेही युतीचाच विजय निश्चित दिसून येतो व झालेही तसेच. कारंजा येथे मतदारांनी केलेल्या मतदानाचा विचार करता येथे युतीचीच जागा निवडून येणार, असे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येते. परंतु, ही जागा युती असती तर शिवसेनेच्या वाटेला असती व इथे शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय असता. पण, फारकतीमुळे येथे सेनेचे नुकसान दिसून येत आहे. युती व आघाडी नसली तरी मतदारांना मात्र आपले मत नोंदवताना कसलीही अडचण भासली नाही.