पारंपारिक पिकांच्या पे-यात घट
By Admin | Updated: January 29, 2015 00:35 IST2015-01-29T00:35:10+5:302015-01-29T00:35:10+5:30
बदलत्या शेतीपद्धतीमुळे चारा टंचाई; मुग, उडीद, ज्वारी पिकांकडे शेतक-यांनी फिरवली पाठ.

पारंपारिक पिकांच्या पे-यात घट
वाशिम : गत काही वर्षांपासून विदर्भातील शेतकर्यांनी मुग, उडीद, ज्वारी, कपाशी या पिकांकडे पाठ केली असून, कमी खर्चिक आणि कमी परीश्रम लागणारे नकदी पिक म्हणून सोयाबीनकडे मोर्चा वळविला आहे. बदलत्या शेतीपद्धतीमुळे अनेक समस्या उद्भवत असून, चाराटंचाई ही त्यापैकीच एक आहे.
जवळपास १५ वर्षांपूर्वीपर्यंत विदर्भात ज्वारी, उडीद, मुग, तूर, कपाशी या पिकांचा पेरा मोठय़ा प्रमाणात होता.; परंतु बदलत्या काळानुसार विदर्भातील शेतीपद्धतीमध्येही बदल होत गेला आणि या भागातील पारंपरिक पिके म्हणून ओळखल्या जाणारी उडीद, मुग, कपाशी, ज्वारी या पिकांकडे शेतकर्यांनी पाठ फिरविली. त्यापैकी ज्वारी हे पिक, तर जवळपास कालबाहय़च होण्याच्या मार्गावर आहे. वन्यप्राण्यांचा हैदोस, बदलते ऋतूचक्र , तसेच शासनाच्या शेतीविषयक कुचकामी धोरणामुळेच शेतकर्यांनी या पिकांकडे पाठ फिरविली.
अलिकडच्या काळात उडीद, मुग, तूर ही पिके काही प्रमाणात घेतल्या जात असली तरी, त्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक घटले आहे. कपाशीची तीच स्थिती आहे, तर ज्वारीचे पिक मात्र दिसेनासेच झाले आहे. या सर्व पिकांमुळे शेतकर्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध होत अस. उडीद, मुग, तूर या दाळवानांपासून कुटार निघायचे, तर ज्वारीपासून कडबा मिळत असे. त्यामुळे शेतकर्यांकडे असलेल्या जनावरांच्या चार्याची सोय व्हायची.
९५ टक्क्यांहून अधिक शेतकरी मळणी यंत्राचा वापर करीत असल्यामुळे या पिकांचे कुटारही बिचार्या जनावरांना मिळेनासे झाले आहे. कपाशीच्या पेर्यात घट झाल्यामुळे सरकी आणि सरकीच्या ढेपेचे उत्पादनही घटले आहे. कधी काळी पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्या कपाशीसाठी विदर्भ प्रसिद्ध होता; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पणन विभागाचे चुकीचे धोरण आणि कपाशीला मिळणार्या अत्यल्प दरामुळे शेतकर्यांनी कपाशीकडे पाठ फिरविली असून, त्याचा परिणाम येथील उद्योगांवरही झाला आहे.